महामार्ग चाैपदरीकरणः कणकवली शहरासमोर नव्या ओळखीचे आव्हान 

A new identity challenge in front of Kankavli city Due To Highway Bridge
A new identity challenge in front of Kankavli city Due To Highway Bridge

कणकवली ( सिंधुदुर्ग ) - हुंबरट तिठा आणि त्यापुढील तीव्र उतार किंवा वागदे डंगळवाडीतील अवघड वळणे पार करताना प्रत्येक प्रवाशाला लवकरच कणकवली शहरात पोचणार याची जाणीव व्हायची; मात्र महामार्ग चौपदरीकरणात ओळखीची ही ठिकाणे आता इतिहास जमा झाली आहेत.

लवकरच कणकवली शहरातील उड्डाणपूल खुला होणार असल्याने शहरातील प्रसिद्ध पटवर्धन चौक तसेच खमंग नाश्‍ता - जेवणाची हॉटेल, खानावळ, बसस्थानकासमोरील वडपिंपळ, इतर चौक, नाके हे देखील विस्मृतीत जाण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे आता कणकवली शहराची नवीन ओळख निर्माण करण्याचे आव्हान लोकप्रतिनिधींसह इथले व्यावसायिक, व्यापारी, संस्था आणि नागरिकांपुढे आहे. 

कणकवलीतून 1931 ते 1935 या दरम्यान मुंबई - गोवा महामार्ग सुरू झाला. त्यानंतर कणकवली शहर विकसित होऊ लागले. हे शहर 1975 पर्यंत हातमागाचे केंद्र तथा मॅंचेस्टर नगरी म्हणून ओळखले जात होते. इथल्या कापडाचा व्यापार बेळगाव ते गुजरातपर्यंत पसरला होता. यांत्रिक हातमाग आल्यानंतर हळूहळू हातमाग बंद पडत गेले.

1990 नंतर कणकवली शहर ही व्यापारी पेठ तसेच राजकीय घडामोडींचे केंद्र बनले. महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाला प्रारंभ होईपर्यंत कणकवली शहरात पटवर्धन चौक, हॉटेल सह्याद्रीसमोरील वडपिंपळ, शासकीय विश्रामगृह ही राजकीय घडामोडींची केंद्रे बनली होती. त्याचबरोबर महामार्गालगतच्या विविध वस्तूंच्या छोट्या-मोठ्या दुकान व्यावसायिकांनी, संस्थांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. 

चौपदरीकरणात महामार्ग दुतर्फा असलेली बाजारपेठ विस्थापित झाली. यात काही व्यापाऱ्यांनी त्या भागात नव्याने व्यवसाय सुरू केला. अनेक दुकान व्यावसायिकांनी बाजारपेठेच्या तसेच शहराच्या इतर भागात आपली दुकाने स्थलांतरित केली. 

येत्या काही दिवसांत कणकवली शहरातून होणारी संपूर्ण वाहतूक उड्डाणपुलावरून वळवली जाणार आहे. त्यामुळे बाजार किंवा अन्य कामानिमित्तच नागरिकांचे शहरात येणे-जाणे होणार आहे. बहुतांश पर्यटक मंडळी कणकवलीच्या उड्डाणपुलावरूनच पुढे मार्गस्थ होणार आहेत. त्याचा इथल्या व्यापार उदिमावर मोठा परिणाम होईलए अशी शक्‍यता व्यक्‍त केली जात आहे. तसेच महामार्गालगत नव्या बाजारपेठा विकसित होऊ लागल्या आहेत. त्यामुळे पर्यटकांसह नव्या-जुन्या सर्व ग्राहकांना पुन्हा कणकवली शहरात आणण्यासाठी नव्या उपक्रमांची निर्मिती करावी लागणार आहे. 

पर्यटकांसाठी सुविधांची गरज 
कणकवली नगरपंचायतीच्यावतीने शहरात जलतरण तलावासह अद्ययावत उद्यानाची निर्मिती केली जात आहे. त्याधर्तीवर पर्यटनाच्या अनुषंगाने नदीपात्रात बोटिंग सुविधा आणि इतर अनेक उपक्रमांचीही निर्मितीही करणे आवश्‍यक झाले आहे. 

कला दालनाची गरज 
महात्मा गांधींचे अनुयायी असलेल्या अप्पासाहेब पटवर्धन यांनी स्वच्छतेचे अनेक प्रयोग कणकवलीत राबवले. दोन अखिल पातळीवरील नाट्यसंमेलनेही कणकवलीत झाली. तसेच सिने-नाट्यसृष्टीतील अनेक कलावंत शहरातून घडले. तसेच अनेक कलावंतही शहराच्या जडणघडणीत योगदान देत आहेत. या सर्वांच्या सहकार्यातून शहरात कलादालन निर्माण झाले तर कनकनगरीची नवी ओळख देखील निर्माण होऊ शकते. त्यादृष्टीनेही प्रयत्न होणे गरजेचे आहे. 
 
महामार्गालगतच अतिक्रमणे हटविण्याची गरज 
सध्या शहरातील महार्गाचा बहुतांश भाग अतिक्रमणमुक्‍त आहे. याखेरीज अवजड वाहतूक उड्डाणपुलावरून होत असल्याने शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्‍न निकाली निघाला आहे. त्यासोबतच आता वाहतूक पार्किंगची सुविधा नगरपंचायतीने निर्माण केली तर उड्डाणपुलावरून जाणारा पर्यटक बाजारपेठेतही काही काळासाठी येऊ शकतो. यातून व्यापार-उदिमालाही चालना मिळू शकते. 

भाजी व इतर विक्रेत्यांचेही नियोजन हवे 
महामार्गात विस्थापित झालेले शहरातील भाजी तसेच इतर वस्तूंच्या विक्रेत्यांनी सध्या शहराच्या विविध प्रभागांमध्ये आपली दुकाने सुरू केली आहेत. मात्र पुढील काळात हे सर्व विक्रेते उड्डाणपुलाखालील मोकळ्या जागेत आपली दुकाने स्थलांतर करण्याची शक्‍यता आहे. तसे झाल्यास पुन्हा महामार्ग अतिक्रमणाने व्यापण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे या विक्रेत्यांचे नियोजन नगरपंचायत प्रशासनाने आत्तापासूनच करण्याची आवश्‍यकता आहे. 

"" कणकवली शहरात हायवे हद्द निश्‍चिती तसेच महामार्ग प्राधिकरणकडून महामार्ग दुतर्फा नळपाणी योजना, भूमिगत वीज वाहिन्या आणि नियोजित गॅस पाइपलाईनसाठी जागा निश्‍चित करून घेत आहोत. ही कामे पूर्ण झाल्यानंतर शहरात दुचाकी, तीनचाकी, चार चाकी व इतर वाहन पार्किंगसाठी जागा निश्‍चित केल्या करून देणार आहोत. त्याअनुषंगाने नियोजन करण्यात आले आहे. येत्या महिन्याभरात उड्डाणपुलाखालील सेवा रस्त्याचे काम पूर्ण होईल. यात पार्किंग व्यवस्थेचाही प्रश्‍न मार्गी लावणार आहेत.'' 
- समीर नलावडे, नगराध्यक्ष कणकवली 

"" कणकवलीत उड्डाण पूल होण्याआधी हायवेवर शंभरहून अधिक विविध प्रकारची दुकाने होती. पूर्वी पर्यटक शहरात येऊन भालचंद्र महाराज संस्थानमध्ये दर्शन घ्यायचे आणि शहरात खरेदी करायचे. हॉटेलमध्ये नाश्‍ता, जेवायला थांबायचे. आता हे सगळे आता संपणार आहे. त्याचा शहराच्या आर्थिक उलाढालीलवरही परिणाम होईल. पण विकासाच्या प्रक्रियेत गावांचे इतिहास, भूगोल बदलतात. हे सगळे स्वीकारण्याशिवाय पर्याय नाही; मात्र पर्यटकांना पुन्हा कणकवलीत खेचून आणण्यासाठीच्या उपक्रमांची उभारणी देखील तेवढीच अनिवार्य आहे.'' 
- अशोक करंबेळकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com