रत्नागिरीतील वैद्यकीय महाविद्यालय दांडेआडोम, कापडगावला : उदय सामंत

सकाळ वृत्तसेवा
Friday, 30 October 2020

२०२१-२२ या शैक्षणिक वर्षात १०० जागांसाठी प्रवेश प्रक्रियाही सुरू होईल

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालय दांडेआडोम आणि कापडगाव येथील २५ एकर जागेवर उभारण्याचा प्रस्ताव  शासनाकडे दोन दिवसांत पाठविण्यात येणार आहे. हे महाविद्यालय जिल्हा शासकीय रुग्णालय परिसरात सुरू करण्यात येईल, त्यासाठीचा करार तत्काळ केला जाणार आहे. २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात १०० जागांसाठी प्रवेश प्रक्रियाही सुरू होईल, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली.

हेही वाचा - लयभारी ! पारंपारीक कलेतून कोकणच्या लाल मातीने साकारलेत आधुनिक वॉल म्युरल्स -

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले, रत्नागिरी, सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी जागा हस्तांतरणासंदर्भात बैठकीचे आयोजन केले होते. या वेळी डॉ. विजय शेगोकार, डॉ. शैलेद्र जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी राजश्री मोरे उपस्थित होत्या. महाविद्यालयाचा प्रस्ताव तयार करून जिल्हा प्रशासनाबरोबर जागेचा करार करणे, मेडिकल कौन्सिलकडे पाठवून तो मंजूर करून घेणे यासाठी डीन म्हणून अधिकारी नेमण्यात आला आहे.

रत्नागिरीसाठी मिऱ्या येथील २२ एकर जागेचा विचार सुरू होता; मात्र किनारी भागामुळे सीआरझेडचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो. त्यासाठी दांडेआडोम येथील १७ एकर आणि कापडगाव येथील साडेआठ एकर अशी २५ एकर जागा निश्‍चित केली आहे. तसा प्रस्ताव दोन दिवसांत शासनाकडे जाईल. आठ दिवसांत तसा शासन निर्णयही काढला जाईल. त्यानंतर जागेचा सातबारा रत्नागिरी शासकीय वैद्यकीय कॉलेजच्या नावाने होणार आहे.

३० नोव्हेंबरपूर्वी परवानगीसाठी मेडिकल कौन्सिलकडे प्रस्ताव जाईल. परवानगी मिळेपर्यंत पुढील तीन वर्षे जिल्हा शासकीय रुग्णालयात कॉलेजचे कामकाज सुरू होईल. तसा करार सिव्हिल प्रशासनाबरोबर केला जाणार आहे. जिल्हा रुग्णालयात कॉलेजच्या पहिल्या वर्षाचे शिक्षण सुरू करण्यात येईल. तिथे सध्या ५०० बेडस्‌ उपलब्ध असून कॉलेजसाठी ३०० बेडस्‌ची आवश्‍यकता आहे. त्यामुळे महिला रुग्णालय आणि मनोरुग्णालय जोडण्याची गरज उरणार नाही.

हेही वाचा - दहशत माजविणारा बिबट्या जेरबंद करेपर्यंत दुसऱ्याकडून गाईवर हल्ला

मेडिकल कॉलेज उभारताना जिल्हा रुग्णालयापासून ३० मिनिटे रस्त्यावरून वाहतूक तर दहा किलोमीटर हवाई अंतर अपेक्षित आहे. दोन्ही ठिकाणांची चाचपणी केली आहे. दोन्हीपैकी कोणत्या जागेवर कॉलेजची उभारणी करायची याचा निर्णय लवकरच होईल. वैद्यकीय महाविद्यालयाला लागणाऱ्या निधीची आणि कर्मचारी पदनिर्मितीचा निर्णय प्रस्ताव सादर केल्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला जाईल, असे सामंत यांनी सांगितले.

डॉक्‍टरांचा प्रश्‍न मार्गी

वैद्यकीय महाविद्यालयामुळे येत्या तीन वर्षात डॉक्‍टरांचा प्रश्‍न मार्गी लागेल तसेच अप्रत्यक्षरीत्या रोजगारही उपलब्ध होऊ शकतो. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या तीन ठिकाणी एकाचवेळी महाविद्यालये सुरू होणार असल्याने कोकणातील मुलांना वैद्यकीय शिक्षणासाठी अन्यत्र जावे लागणार नाही, असे सामंत यांनी सांगितले.

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: new medical college of ratnagiri launched in dandeadom kapadgaon in ratnagiri in 2021 2022