esakal | नाणार होणे अशक्यच; पण दोनशे एकरात नवा प्रकल्प आणणार..... कोणी केली कोकणवासियांसाठी घोषणा... वाचा
sakal

बोलून बातमी शोधा

Uday-Samant

रत्नागिरी जिल्ह्यात नवीन उद्योग यावेत, या मताशी मी सहमत आहे.

नाणार होणे अशक्यच; पण दोनशे एकरात नवा प्रकल्प आणणार..... कोणी केली कोकणवासियांसाठी घोषणा... वाचा

sakal_logo
By
राजेश शेळके

रत्नागिरी : नाणार प्रकल्प परत होणार नाही, ही काळ्या दगडावरची रेष आहे. उद्धव ठाकरे यांनी त्याला कधीच पूर्णविराम दिला आहे, असे शिवसेना नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी शनिवारी ठणकावले. रत्नागिरीत येत्या तीन महिन्यांमध्ये सुमारे 200 एकर जागेमध्ये मोठा प्रकल्प सुरू केला जाणार आहे. तीन वर्षांमध्ये हा प्रकल्प उभारला जाईल, अशी नवीन प्रकल्पाची घोषणाही त्यांनी केली.

नाणार प्रकल्पाबाबत तीन महिन्यांमध्ये निर्णय घेण्याचा अल्टीमेटम केंद्र शासनाने राज्य शासनाला दिला आहे, अशी माहिती भाजपचे प्रदेश सरचिटणीस प्रमोद जठार यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत दिली होती. या संदर्भात उदय सामंत म्हणाले, ``जनतेची भूमिका उचलून धरत शिवसेनेने दिलेला शब्द पाळला आणि नाणार प्रकल्प रद्द केला. केंद्राने काय अल्टीमेटम दिला आहे, हे माहित नाही. परंतु शिवसेनेकडून नाणार प्रकल्प रद्द केल्याची घोषणा मागे घेतली जाणार नाही. नाणार प्रकल्प होणार नाही, ही काळ्या दगडावरची रेष आहे; मात्र जिल्ह्यात नवीन उद्योग यावेत, या मताशी मी सहमत आहे. कोरोनामुळे मोठ्या प्रमाणात मुंबई व इतर जिल्ह्यातील चाकरमानी नोकऱ्या सोडून जिल्ह्यात आले आहेत. त्यांच्या हाताला रोजगार मिळावा, यासाठी 150 ते 200 एकरमध्ये मोठा प्रकल्प येत्या तीन महिन्यामध्ये सुरू केला जाईल.`` मात्र कसला प्रकल्प ते त्यांनी स्पष्ट केले नाही. 

पर्यटनाशी संबंधित प्रकल्प असण्याची शक्‍यता आहे. कोकण कृषी विद्यापीठाशी चर्चा करून कृषीविषयक रोजगार देण्याबाबत आमचा प्रयत्न सुरू आहे. यापूर्वी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी बीच शॅक्‍सची घोषणा केली आहे. त्यामध्ये पायलट प्रोजेक्‍ट म्हणून आरे-वारे (रत्नागिरी) आणि गुहागर किनाऱ्याचा समावेश केला आहे. त्यामुळे भविष्यात जिल्ह्यात नोकरी, रोजगारावर भर देण्याचा प्रयत्न आहे, असेही श्री सामंत यांनी स्पष्ट केले.

नारळाच्या झाडाला प्रत्येकी 250 रुपये
"निसर्ग' चक्रीवादळामध्ये झालेल्या नुकसानीबाबत प्रत्येक झाडनिहाय भरपाई देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. नारळाच्या झाडाला प्रत्येकी 250 रुपये तर पोफळीच्या झाडाला 50 रुपये याप्रमाणे भरपाई दिली जाणार आहे, असे सामंत यांनी सांगितले. 

loading image