
दापोलीला ‘मिनी महाबळेश्वर’ संबोधले जाते
दाभोळ (रत्नागिरी) : सामाजिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरा असलेल्या दापोली तालुक्याची महती सांगणाऱ्या ठसकेबाज गाण्याचे रेकॉर्डिंग आणि शूटिंग होणार आहे. या गाण्याने लवकरच दापोली दणाणणार आहे. ‘वाट घमघम वळणाचा रस्ता... कोलीम भाकरीचा रस्सा .... बंदरावर शेल्फी काढतीया मांदेली ....’ या गाण्यावर दापोलीकर थिरकताना दिसणार आहेत.
प्रसिद्ध संगीतकार हरिश चव्हाण यांनी संगीतबद्ध केलेल्या या गीताचे शब्द कोकणातील प्रसिद्ध कवी प्रा. कैलास गांधी यांचे असून, तालुक्यातील सुमारे ३५ हून अधिक गायक, कलाकार या गाण्यात सहभागी होणार आहेत. या गाण्यासाठी लवकरच गायकांची तसेच कलाकारांची ऑडिशन टेस्ट घेण्यात येणार आहे. यामधून निवड झालेल्या गायक, कलाकारांना या गाण्यामध्ये संधी देण्यात येणार आहे. ऑडिशनसाठी दापोली येथील दीप्ती शेवडे व नंदिता पतंगे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.
हेही वाचा - तसा प्रस्ताव केंद्र सरकारने तयार केला आहे ; विनायक राऊत
नृत्य तसेच इतर गोष्टींसाठीदेखील स्थानिक कलाकारांचा सहभाग आहे. दापोलीकरांनी केलेले ‘दापोलीचे गाणे’ अशी या गाण्याची ओळख होईल, असा विश्वास चव्हाण यांना आहे. दापोलीला ‘मिनी महाबळेश्वर’ संबोधले जाते, विकेंड तसेच सुट्यांच्या दिवशी दापोली तालुक्यातील पर्यटनस्थळे पर्यटकांनी भरलेली असतात. दापोलीतील समुद्रकिनारे, आध्यात्मिक स्थळे, ऐतिहासिक स्थळे याकडे पर्यटकांची पावले सतत वळत असतात.
यामुळेच दापोलीचे स्वत:चे असे एक ठसकेबाज गीत असावे, अशी संकल्पना आहे. गाण्याला चालही देण्यात आली आहे.
दापोलीतील विविध ठिकाणी या गीताचे चित्रीकरण केले जाणार आहे. त्यामुळे लवकरच दापोलीकर ‘वाट घमघम वळणाचा रस्ता... कोलीम भाकरीचा रस्सा .... बंदरावर शेल्फी काढतीया मांदेली .... ’या गाण्याच्या डीजेवर थिरकताना दिसणार आहेत.
हेही वाचा - अस्सल संगमेश्वरी बोलीतील गूढकथा ; साध्या-भोळ्या शेतकरी गावकऱ्यांची कला
दापोलीतील कलाकारांसाठी ऑडिशन टेस्ट
गायकांबरोबरच छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, साने गुरुजी, माता रमाई, लोकमान्य टिळक, महर्षी कर्वे यांच्या भूमिकेत बसू शकतील असे चेहरे, मावळे, मंगळागौर या कार्यक्रमासाठी महिला, पालखी सोहळा, बाल्या डान्ससाठी मुले, वारकरी संप्रदाय, नवरा नवरी अशा भूमिकांसाठी फक्त दापोली तालुक्यातील कलाकारांची ऑडिशन टेस्ट २१ व २२ जानेवारी रोजी सकाळी १०.३० वाजल्यापासून दापोली शहरातील नर्सरी रोडवरील पेन्शनर्स असोसिएशन हॉल येथे घेतली जाणार आहे.
संपादन - स्नेहल कदम