'सरकारने ठरविलेच आहे जनतेच्या जीवाशी खेळायचे' : निलेश राणे

राजेश कळंबटे
Saturday, 19 September 2020

सरकार कंपन्यांच्या नफ्यासाठी हितसंबंध जोपासत असल्याची टीका भाजपा नेते, माजी खासदार निलेश राणे यांनी केली आहे. 

रत्नागिरी : अधिक नफा मिळवण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील रुग्णांकरिता आलेला ऑक्सिजन टँकर रायगड गॅसेस कंपनीने मंत्री आणि मुख्य सचिवांचे वजन वापरून ऑक्सिजन न उतरवताच जिल्हाधिकाऱ्यांकडून काढून घेतला. यामुळे राज्य सरकारला आणि जिल्हाप्रशासनाला जनतेच्या जीवाशी सोयरसुतक नसल्याचे उघड झाले असून सरकार कंपन्यांच्या नफ्यासाठी हितसंबंध जोपासत असल्याची टीका भाजपा नेते, माजी खासदार निलेश राणे यांनी केली आहे. 

हेही वाचा - ‘प्रशासन आहे की नोकरशाही ?’ कोकणात सदस्य विचारत आहेत प्रश्न

रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत रुग्णांना ऑक्सिजनची गरज मोठ्या प्रमाणावर लागत आहे. मात्र जिल्हा प्रशासन आणि राज्य सरकार यांच्यातील गोंधळ चव्हाट्यावर आला असतानाच भाजपा नेते, माजी खासदार निलेश राणे यांनी मोठा खुलासा केला आहे. यातून जिल्हा प्रशासन आणि राज्य सरकार रुग्णांच्या जीवाशी कसे खेळत आहेत ते समोर येते.

 

 

 

सुनील गुप्ता याच्या रायगड गॅसेस या कंपनीचा ऑक्सिजन जिल्हाधिकारी यांनी रत्नागिरी करिता मागविला होता. रत्नागिरी जिल्ह्याची ऑक्सिजनची गरज दिवसाला 15 टन एवढी आहे. मात्र 10 टन ऑक्सिजनची कमतरता आहे. भविष्य काळात वाढत असलेली रुग्णसंख्या लक्षात घेता ऑक्सिजनची गरज देखील वाढणार आहे. मात्र सरकारला जनतेचे होत असलेले हाल दिसत नाही आहेत. राज्य सरकारला कंपन्यांचे हित जोपासताना दिसत आहे. कारण रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी यांनी गुप्ता याच्या रायगड गॅसेसकडून मागविलेली ऑक्सिजनची गाडी ऑक्सिजन न उतरवताच निघून गेली. 

वैद्यकीय उपचारासाठी असणाऱ्या ऑक्सिजनसाठी कमी किंमत मिळते तर तोच ऑक्सिजन जर इंडस्ट्रीत म्हणजेच उद्योगासाठी दिला गेला तर त्याच ऑक्सिजनची किंमत वाढते. त्यामुळे या सुनील गुप्ताने मुख्य सचिव आणि मंत्र्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांवर दबाव आणून ती ऑक्सिजनची गाडी रत्नागिरीतून सोडवून घेतली. हाच सुनील गुप्ता लोटे येथील एमआयडीसी मध्ये ऑक्सिजनचा पुरवठा करतो. त्यामुळे अधिकचा नफा मिळवण्यासाठी दबावाचा वापर करून जिल्ह्यातील जनतेला राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनाने वाऱ्यावर सोडले आहे, असा निलेश राणे यांनी आरोप केला आहे. या प्रकारामुळे जिल्ह्यात ऑक्सिजनची कमतरता जाणवणार असून ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे निलेश राणे यांनी म्हंटले आहे. 

हेही वाचा -  शिक्षकांच्या सहभागाने कोकणात ऑफलाइन शिक्षण पद्धतीही रुजतीये..!

उद्या रुग्णांना ऑक्सिजन मिळेल की नाही याची शाश्वती जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री देऊ शकत नाहीत. त्यामुळे या गोष्टीकडे जिल्हाधिकारी यांनी दुर्लक्ष करू नये. ऑक्सिजनसाठी लवकरात लवकर तरतूद करावी, जिल्ह्यातील रुग्णांना ऑक्सिजन मिळायलाच हवा त्यासाठी आम्ही पाठपुरावा करणार असल्याचेही निलेश राणे यांनी स्पष्ट केले आहे.

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nilesh rane comment on state administration topic of oxygen providing in ratnagiri