नीलेश राणे म्हणाले, दीपक केसरकर 'हाच' मुद्दा आणणार पण आम्ही...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 डिसेंबर 2019

नगराध्यक्ष पोट निवडणुकीसाठी भाजपतर्फे संजू परब यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पक्षाच्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

सावंतवाडी ( सिंधुदुर्ग ) - माजी मंत्री दीपक केसरकर यांनी नेहमी दहशतवाद पुढे करत निवडणुका जिंकल्या आहेत. त्यामुळे या निवडणुकीतही ते 15 दिवस हाच मुद्दा नागरिकांमध्ये नेतील; मात्र विकासाच्या मुद्‌द्‌यावर निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे माजी खासदार डॉ. नीलेश राणे यांनी आज येथे सांगितले. 

येथील नगराध्यक्ष पोट निवडणुकीसाठी भाजपतर्फे संजू परब यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पक्षाच्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार नितेश राणे, प्रदेश चिटणीस राजन तेली, जिल्हा बॅंक संचालक अतुल काळसेकर, तालुकाध्यक्ष महेश सारंग, संदीप कुडतरकर, संजू परब आदी उपस्थित होते. 

24 तास लोकांमध्ये असलेला उमेदवार

राणे म्हणाले, ""परब यांना याठिकाणी पक्षाकडून अधिकृत उमेदवारी दिली आहे. आम्ही याठिकाणी विकासाच्या मुद्‌द्‌यावर सामोरे जाणार आहोत. कोणावर वैयक्तीक टिका टिपणी करणार नाही. आमचा उमेदवार व्यावसायिक व पारदर्शक आहे. 24 तास लोकांमध्ये असलेला उमेदवार दिला आहे. तो नक्कीच पदाला योग्य न्याय देणारा ठरेल. त्यामुळे काही झाले तरी आमचाच विजय होणार आहे.'' 

विकासाच्या मुद्‌द्‌यावर निवडणुकीला सामोरे

ते म्हणाले, ""श्री. केसरकर यांनी नेहमी नारायण राणे यांच्यावर टीका करत निवडणुका जिंकल्या आहेत. आजही त्यांच्याकडे दहशतवादाच्या मुद्‌द्‌याशिवाय विकासाचा इतर कुठलाही मुद्दा नाही. त्यामुळे 15 दिवसांत "कस काय' वातावरण निर्माण करून ते येथील नागरिकांना मतदानासाठी भावनिक हाक देतील; मात्र आम्ही विकासाच्या मुद्‌द्‌यावर या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत.'' 

सावंतवाडीत प्रकल्पांची गरज

आमदार राणे म्हणाले, ""दहशतवादाच्या व भावनिक मुद्‌द्‌यावर विकास होत नाही. ज्याप्रमाणे कणकवली, वैभववाडीचा विकास झाला, त्याठिकाणी विविध प्रकल्प आले, त्याचप्रमाणे येथे प्रकल्प होणे गरजेचे होते; मात्र अनेक वर्षांत याठिकाणी कोणताही प्रकल्प आला नाही. पालकमंत्री केसरकर यांच्याकडे वित्त खाते असतानाही ते नगरोत्थान निधी सोडून पालिकेकडे इतर कुठलाही निधी आणला नाही. त्यामुळे याचा फटका स्थानिक जनतेला बसला आहे. येणाऱ्या काळात विकासाचा मुद्दा पुढे करून लोकांसमोर जाणार आहोत.'' काळसेकर म्हणाले, ""ज्याप्रमाणे बांद्यात विजय मिळवला त्याप्रमाणे उद्याची आंब्रड जिल्हा परिषद सदस्य निवडणूक व त्यानंतर सावंतवाडी नगराध्यक्ष लढतीत विजय मिळवू. आता जिल्हा भाजपाने बांदा ते चांदा मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे.'' 

दोन वर्षांत कायापालट करू 

संजू परब म्हणाले, ""पक्षाने व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आपल्यावर टाकलेला विश्‍वास नक्कीच सार्थकी लावू. गेल्या 23 वर्षांत सावंतवाडीमध्ये जो विकास झाला नाही तो येत्या दोन वर्षांत भाजपच्या माध्यमातून व नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली करू.''  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nilesh Rane Comments On Deepak Kesarkar In Sawantwadi