काँग्रेसच्या नेत्याकडून 'येथे' शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार

सकाळ वृत्तसेवा
Monday, 6 January 2020

काँग्रेस पक्षाच्या ध्येयधोरणांना तिलांजली देऊन शिवसेनेसाठी आणि पर्यायाने शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार मनोहर बाईत यांचा प्रचार करून भाजपच्या उमेदवाराच्या मतांची विभागणी करण्याचा अविनाश लाड यांचा डाव आहे.

लांजा ( रत्नागिरी ) - काँग्रेस पक्षाचे नेते अविनाश लाड शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार मनोहर बाईत यांचा प्रचार करीत असल्याचा घणाघाती आरोप माजी खासदार आणि भाजपचे नेते नीलेश राणे यांनी लांजा येथील पत्रकार परिषदेत केला आहे. 

काँग्रेस पक्षाच्या ध्येयधोरणांना तिलांजली देऊन शिवसेनेसाठी आणि पर्यायाने शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार मनोहर बाईत यांचा प्रचार करून भाजपच्या उमेदवाराच्या मतांची विभागणी करण्याचा अविनाश लाड यांचा डाव आहे. मात्र तो हाणून पाडला जाईल, असा इशारा श्री. राणे यांनी दिला आहे. नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी श्री. राणे हे सोमवारी लांजा येथे आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. 

हेही वाचा - सिधुदुर्गात पर्यटनासाठी जाणार आहात, मग हे जरूर वाचा... 

भाजपलाच चांगले वातावरण

श्री. राणे म्हणाले, लांजा नगरपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये भाजपला चांगले वातावरण आहे. नगराध्यक्षपदाचे अधिकृत उमेदवार म्हणून ऍड. सुमंत वाघधरे हेच विजयी होतील. तसेच 13 जागांवरील सर्व नगरसेवक निवडून येतील, असा ठाम विश्वास श्री. राणे यांनी व्यक्त केला. विरोधकांनी कितीही वल्गना केली तरी लांजा नगरपंचायतीवर भाजपचीच सत्ता येणार, असेही ते म्हणाले. पत्रकार परिषदेला भाजपचे पदाधिकारी प्रसाद पाटोळे, सुमंत वाघधरे, तालुकाध्यक्ष यशवंत वाकडे, जिल्हा नेते मुन्ना खामकर आदी उपस्थित होते.  

हेही वाचा - का बसताहेत येथे शिवसेनेला पराभवाचे धक्के ? 

रुपेश गांगण यांचा भाजपशी संबंध नाही 

निवडणुकीत भाजपचे पदाधिकारी रुपेश गांगण हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात आहेत. त्यांचा राजीनामा पक्षाने मंजूर केला आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाशी त्यांचा काही संबंध नाही. मात्र तरीही ते आपण भाजपचे असल्याचे सांगून मतदारांची दिशाभूल करीत आहेत. भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराच्या मतांचा विभागणी करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला जाईल असा इशारा श्री. राणे यांनी दिला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nilesh Rane Comments On Lanja Nagar Panchayat Election