esakal | ..तर अनेकांचे जीव वाचले असते; नीलेश राणेंचे अनिल परबांवर टीकास्त्र

बोलून बातमी शोधा

..तर अनेकांचे जीव वाचले असते; नीलेश राणेंचे अनिल परबांवर टीकास्त्र
..तर अनेकांचे जीव वाचले असते; नीलेश राणेंचे अनिल परबांवर टीकास्त्र
sakal_logo
By
राजेश कळंबटे/

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्हा अनाथ असल्यासारखा पालकमंत्र्याची तीन तीन महिने वाट बघतात, पण तोच रत्नागिरीचा पालकमंत्री मुंबईत स्वतःचं १००० फुटाचं अनधिकृत ऑफिस वाचवण्यासाठी मंत्रीपद वापरतोय. जी जिद्द स्वतःचं ऑफिस वाचवण्यासाठी वापरली ती रत्नागिरी जिल्ह्यासाठी वापरली असती तर अनेकांचे जीव वाचले असते असे खडेबोल भाजपचे नेते, महाराष्ट्र प्रदेश सचिव,माजी खासदार निलेश राणे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब यांना सुनावले आहे.

आज रत्नागिरी जिल्हा दिवाळखोरीत गेला. तिकडे सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्हा झपाट्याने विकासकामे होत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना वेगाने वाढत असताना देखील सेनेचे पालकमंत्री, आमदार, खासदार सर्वसामान्य जनतेला वाऱ्यावर सोडलं आहे. त्याना वाली कोण असा प्रश्न जनतेतून उपस्थित होत आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांना ऑक्सिजन, बेड, रेमडीसीवीर इंजेक्शन मिळेना एवढी भयंकर परिस्थिती असताना देखील सेनेचे लोकप्रतिनिधी झोपी गेले आहेत. जिल्ह्याचा पालकमंत्री कोण? हे देखील जिल्ह्याला माहिती नाही. जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब यांना ऑक्सिजन टँकर आणण्यासाठी ड्रायव्हर मिळत नाहीत तर हे सेनेचे मंत्री जिल्ह्याचा विकासकामे काय करणार.

आज जिल्हा मृत्यूच्या दाढेत असताना कोरोना होईल म्हणून सेनेचे मंत्री स्वतच्या मतदारसंघात फिरकताना दिसत नाही. अनिल परब मुंबईत बसून मंत्री पदाचा वापर करत खंडणी वसुली करण्याच काम करत आहेत. जिल्ह्यात जनतेच्या हितासाठी कवडीची देखील मदत करताना दिसत नाही. जिल्ह्याच्या पालकमंत्री यांना ड्रायव्हर मिळत नाही त्याच जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोना रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिका देखील मिळत नाहीत अक्षरशः रुग्णांना खासगी वाहनातून रुग्णालयात जावं लागतं आहेत.

जिल्ह्यात ऑक्सिजन कमतरता भासत असताना आठ महिने झाले तरी जिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन प्लॅन्टला मुहूर्तच नाही. तारीख पे तारीख देऊन नव्या प्लॅन्टची घोषणा करतात. कोरोना रुग्ण मेल्यानंतर पालकमंत्री जिल्ह्याला आरोग्य सेवा पुरवणार का अशी संतप्त प्रतिक्रिया जिल्हावासीयांकडून उमटत आहे. जर परब अनधिकृत ऑफिस वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत तोच प्रयत्न रत्नागिरी जिल्हावासीयांसाठी केला असता तर अनेकांचे जीव वाचले असते असे परखड मत निलेश राणे यांनी ट्विट द्वारे मांडले आहे.

Edited By- Archana Banage