मराठा रस्त्यावर उतरले तर सरकारला पळायला लावेल : नीलेश राणे

सकाळ वृत्तसेवा
Friday, 23 October 2020

मराठा समाजावर आंदोलन करायची वेळ आणू नका, असा इशारा भाजप नेते नीलेश राणे यांनी दिला.

रत्नागिरी : मराठ्यांच्या आरक्षणाचा राज्य सरकारने विचका केला आहे. चांगला वकील देता आला नाही. यावरूनच सरकार किती गंभीर आहे, हे दिसते. मराठा समाजावर आंदोलन करायची वेळ आणू नका, असा इशारा भाजप नेते नीलेश राणे यांनी दिला.

रत्नागिरीत पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, राज्य सरकारने नेमलेला वकिल न्यायालयात उपस्थित राहत नाही. तारखांवर तारखा पडत राहिल्या तर मराठा समाजातील तरुणांची अवस्था बिकट होईल. तसे झाले तर सरकारचे काहीच खर नाही. मराठा समाजाच्या आंदोलनाचे नियोजन कसे असते. मागील वेळी सर्वांनीच पाहिले आहे. 

हेही वाचा - विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर आजपासुन कोकण दौऱ्यावर, उद्या रत्नागिरीत दाखल -

मराठा रस्त्यावर उतरले तर सरकारला पळायला लावेल. लवकरच निर्णय घ्या, अन्यथा तीव्र आंदोलन करायला भाग पाडू नका, असा इशारा त्यांनी दिला. तिवरे धरण फुटीला जबाबदार असलेल्यांवर अद्यापही कारवाई झालेली नाही. यासंदर्भात न्यायालयात जायची आमची तयारी आहे, असेही त्यांनी सांगितले.

अहवाल आल्यानंतर पाहू

कोल्हापूरमधून आलेल्या त्या सलाईन साठ्याच्या विषयावर आमचं लक्ष आहे. सध्या चौकशी सुरु असून त्याचा अहवाल काय येतो, हे आम्ही पाहत आहोत. त्यानंतर तो विषय हाताळू. रत्नागिरीत विविध विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरु आहे. प्रत्येक दिवशी एक प्रकरण बाहेर येईल, अशी स्थिती असल्याचे नीलेश राणे यांनी सांगितले.

हेही वाचा - म्हणून दसऱ्याला घटावर होते अठरा धान्यांची पेरणी -

महिन्यानंतर चित्र स्पष्ट

नाणार रिफायनरीसाठीच्या जागांची चौकशी होणार आहे. एक महिन्याच्या आत त्याचा अहवाल विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी मागितला आहे. अजून वीस दिवस शिल्लक आहेत. सध्या चौकशी सुरू आहे की, नाही याबाबत मी जास्त विचार करत नाही. महिना पूर्ण झाल्यानंतर स्पष्ट होईल. या चौकशीत अनेक शिवसैनिकच सापडणार आहेत, असा विश्‍वास त्यांनी व्यक्‍त केला.

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nilesh rane said on the topic of maratha arakshan on press conference in ratnagiri criticized on state government