पशुविभाग सतर्क; बर्ड फ्लूसाठी नऊ विशेष पथके दाखल

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 10 January 2021

जिल्ह्यात रोगाचा शिरकाव नाही: डॉ. पुजारी, प्रादूर्भाव आढळल्यास विशेष पथकाद्वारे उपचार यंत्रणा 

रत्नागिरी :  महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्यानंतर पशुवैद्यकीय यंत्रणा सतर्क झाली आहे. कोंबड्या किंवा पक्षांवर मरतुकीसह विविध रोगांचा प्रादुर्भाव झाल्याची तपासणी करण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात नऊ विशेष पथके सज्ज ठेवली आहेत. जिल्ह्यात या रोगाचा शिरकाव झालेला नसल्याचे पशू वैद्यकीय अधिकारी डॉ. यतिन पुजारी यांनी सांगितले. 

जिल्ह्यात महिला बचत गट, तरुण व्यावसायिक यांसह अनेकांकडून पोल्ट्री व्यवसाय चालवला जातो. दिवसाला हजारोच्या कोंबड्यांची विक्री होत असते. लाखो रुपयांची उलाढाल या माध्यमातून सुरू आहे. कोरोनामुळे गतवर्षी मार्च ते मे या कालावधीत मोठ्या प्रमाणात पोल्ट्री व्यवसायिकांना नुकसान सहन करावे लागले होते. त्यानंतर सहा महिन्यांनी पुन्हा बर्ड फ्लूचे संकट येऊन ठेपले आहे. त्यामुळे पोल्ट्री व्यवसायिकांसह चिकन विक्रेतेही त्रस्त झाले आहेत. महाराष्ट्राच्या शेजारील पाच राज्यात थैमान घातले असून महाराष्ट्रात कुठेही या साथीचा प्रादुर्भाव आढळलेला नाही. अचानक मोठ्या प्रमाणात पक्षी मरण्याचे प्रकार या संसर्गात होते. पोल्ट्री व्यवसायासह बाहेरच्या देशातून स्थलांतरित होऊन मोठ्या प्रमाणात पक्षी जिल्ह्यात येतात. दरम्यान, नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन जिल्हा परिषद पशुधन विकास अधिकारी डॉ. पुजारी यांनी केले आहे. 

"त्या' मृत कावळ्यांचे नमुने भोपाळला 
सात राज्यांत बर्ड फ्लू आढळला असून एन्फ्लुएन्झामुळे विविध राज्यांतील अनेक पक्ष्यांचा झपाट्याने मृत्यू होत आहे. महाराष्ट्रातही काही मृत पक्षी आढळले असून त्यात मुंबई, ठाणे, परभणी आणि बीडसह जिल्ह्यातील दापोली तालुक्‍यांचा समावेश आहे. त्या मृत कावळ्यांचे नमुने भोपाळच्या आयसीएआर-नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हाय सिक्‍युरिटी ऍनिमल डिसिजेस या संस्थेकडे पाठविले असल्याचे पशू विभागाकडून सांगण्यात आले. 

एक दृष्टिक्षेप
जिल्ह्यात परदेशी व स्थलांतरित पक्षी करतात वास्तव्य 
स्थलांतरित पक्षांकडूनही बर्ड फ्लूचा प्रसाराची शक्‍यता 
पशू विभागाने वेळीच उचलली पावले 
पशू केंद्रांतर्गत येणाऱ्या पोल्ट्री व्यावसायिकांची नोंदणी 

प्रत्येक तालुक्‍यात एक पथक 
दरम्यान, कोंबड्यांवर किंवा पशू-पक्षांवर कोणत्याही प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव झाला असल्याची तक्रार आल्यास विशेष पथकाद्वारे उपचार यंत्रणा राबविणार आहे. प्रत्येक तालुक्‍यात एक पथक नेमले आहे. 

 संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nine special squads for bird flu in ratnagiri