`निर्णय`! कोकणच्या कलावंतांची भन्नाट संकल्पना

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 मे 2020

घरात बसून बसून कंटाळलेला प्रदीप आपले घर, झाडं-पेडं यात आपले मन रमवतो.

कुडाळ (सिंधुदुर्ग) - कोरोना संकट कालावधीत गावात राहूनच लाल मातीशी नाते जोडून नवी सुरूवात करण्याचा संदेश देणारी शॉर्टफिल्म 
"स्नेहांश एन्टरटेंनमेंट' या संस्थेने साकारली आहे. "निर्णय' या शिर्षकाखाली या शॉर्टफिल्ममध्ये कोकणातील कलावंतांचा सहभाग आहे. 

स्नेहांश एन्टरटेंनमेंट या संस्थेने लढाय, चोरीचा मामला पाठोपाठ "निर्णय' ही शॉर्ट फिल्म बनवली आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सरकारने देशात लॉकडाउन घोषित केल्याने शिमग्याला मुंबईमधून गावी आलेले तरुण गावातच अडकतात. त्यातील प्रदीप या तरुणाची मुंबईत जाण्यासाठी होणारी तडफड आणि मुलाने गावीच रहावे, यासाठी होणारी आईची तडफड हा या फिल्मचा गाभा आहे.

घरात बसून बसून कंटाळलेला प्रदीप आपले घर, झाडं-पेडं यात आपले मन रमवतो. मुंबईतील कंपनीचा शेठ त्याला त्याचा पगारही देत नाही. मुंबईला कायमचा रामराम करून गावात आलेली ज्येष्ठ व्यक्ती या मुलांना मुंबई विसरून गावी रहायचा सल्ला देते. अखेर वास्तवाची जाणीव झालेला प्रदीप गावातच कायम रहाण्याचा निर्णय घेतो, असे याचे कथानक आहे. 

"प्रकाशवाट' या मूळ कथेवर.... 
महेश गोसावी यांच्या "प्रकाशवाट' या मूळ कथेवर बेतलेल्या "निर्णय' या शॉर्ट फिल्मची संहिता रूपांतर, संकल्पना, सवांद लेखन श्री. गवस यांनी केले आहे. छायांकन आणि संकलन रविकिरण शिरवलकर, दिग्दर्शन स्वप्नील राणे, निर्मिती मयूर चव्हाण यांनी केली आहे. या फिल्ममध्ये शेखर गवस, पूजा राणे, पार्थ कोरडे, सत्यवान गावकर, आनंद जाधव, प्रमोद तांबे, मयूर चव्हाण, सिद्धेश खटावकर यांनी भूमिका साकारल्या आहेत. ही फिल्म "वर्क फ्रॉम होम' या संकल्पनेखाली केली आहे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nirnay shortfilm making snehanch entertainment konkan sindhudurg