मंडणगडात निसर्गग्रस्तांना नुकसानीपोटी ४० कोटी

सचिन माळी
Monday, 28 September 2020

फळबाग लागवड नुकसानग्रस्त बागायतदार शेतकऱ्यांचे  बचत खात्यात 7 कोटी 82 लाख इतकी रक्कम वर्ग करण्यात आली आहे.

मंडणगड : निसर्गचक्री वादळात मंडणगड तालुक्यात प्रचंड नुकसान झाले. या नुकसानीपोटी शासनाकडून भरपाईच्या स्वरूपात आलेला 40 कोटी रुपयांचे वाटप नुकसानग्रस्त नागरिकांना करण्यात आले आहे. याचबरोबर अजूनही वंचित असणाऱ्या नागरिकांना नुकसान भरपाईचा निधी देण्यासाठी तहसिल कार्यालयाकडून 11 कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली असल्याची माहीती तहसिलदार नारायण वेंगुर्लेकर यांनी दिली.

हेही वाचा -  बेकारीची टांगती तलवार असलेल्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा 
                      

निसर्ग चक्री वादळात तालुक्यातील राहत्या घराचे, गुरांचे गोठ्याचे, दुकान, गाळे, यांच्या नुकसानीपोटी 32 कोटी 18 लाख इतकी नुकसान भरपाई नुकसानग्रस्तांचे खात्यात वर्ग केली आहे. तसेच फळबाग लागवड नुकसानग्रस्त बागायतदार शेतकऱ्यांचे  बचत खात्यात 7 कोटी 82 लाख इतकी रक्कम वर्ग करण्यात आली आहे. अजूनही नुकसानासाठी लागणारा 11 कोटी रुपयांचा निधी त्वरीत मिळावा यासाठी शासनाकडे मागणी करण्यात आली आहे. 

राज्यशासनाचे कृषी विभागाचे कार्यालयातून मिळालेल्या माहीतीनुसार निसर्ग चक्रीवादळात तालुक्यातील 7 हजार 283 शेतकरी बाधीत झाले आहेत. 3 हजार 512.98 हेक्टर इतक्या क्षेत्रातील विविध पिकांचे नुकसान झाले. या नुकसानीपोटी तालुका कृषी कार्यालयाच्या वतीने 16 कोटी 31लाख 52 हजार एवढ्या निधीची मागणी करण्यात आली. यातील 2 हजार 803.66 हेक्टर क्षेत्रावरील 5 हजार 783 शेतकऱ्यांचे 12 कोटी 96 लाख 80 हजार इतक्या रक्कमेच्या नुकसानीचे पंचनामे व आवश्यक कागदपत्रे पुर्ण करुन त्याचा अहवाल महसुल प्रशासनाकडे सादर केले आहेत. 

हेही वाचा - सीआरझेड ई-सुनावणीचा सिंधुदुर्ग जिल्ह्यात उडाला फज्जा 

 

अजुनही 1500 शेतकऱ्यांच्या नुकसानीचे अहवाल संबंधीत व्यक्ती मयत झाल्याने तसेच वारस तपास, हमी पत्र न दिल्याने शिल्लक असून त्यावर कार्यवाही सुरु असल्याची माहीती कृषी विभागाकडून देण्यात आली. प्रशासकीय यंत्रणा इतक्या मोठ्या प्रमाणावर काम करीत असली तरी अनेक गावागावातील शेतकरी अजूनही आम्हाला वेगवेगळ्या प्रकारची नुकसान भरपाई मिळत नसल्याची तक्रार करतीच आहेत. अशा तक्रारी लक्षणीय असल्याने वंचीत शेतकऱ्यांच्या लवकर नुकसानभरपाई मिळावी यासाठी स्वतंत्र अभियानाची आवश्यकताही व्यक्त होवू लागली आहे.

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nisarga cyclone suffer people allowed 40 crore in mandangad ratnagiri