आमच्यावर राग काढा पण जिल्ह्यासाठी काहीतरी करा : नितेश राणे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 मे 2020

.ओसरगाव येथील महिला भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

कणकवली - 'मी बोललो ते चुकीचे असेल तर कारवाईला सामोरे जाईन. लॅब मधील रिपोर्ट चुकीचे येतात, उशिराने येतात मग लॅब बाबत राजकारण का ? स्थानिक जनतेने तुम्हाला निवडून दिले आहे.जर चार महिने टेस्टींग लॅब मागणी करत असाल तर तयारी का झाली नाही ? असा संतप्त सवाल भाजपचे आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला आहे.ओसरगाव येथील महिला भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

ते म्हणाले,  मुंबईसह इतर भागातून सिंधुदुर्गात आलेल्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. जे लोक क्वारटाईन  आहेत त्यांचे स्वॅबटेस्ट अद्याप आलेले नाही. मग तुमच्या ज्या बैठका झाल्या त्याचा जनतेला काय फायदा झाला ? जिल्हा परिषद शाळांची काय अवस्था आहे ? तिथे सकाळच्या सत्रात शिक्षक असतात रात्रीचे कोणीही नसते. लोक गावभर फिरतात याबाबतचे माझ्याकडे पुरावे आहेत.
जिल्ह्यात 35 हजार लोक आले असतील तर त्यांना पास कोणी दिले ? मुंबईच्या सिपी ऑफिसने पास इशू केले असतील तर त्या लोकांची यादी सिंधुदुर्गाकडे का पाठवली नाही ?

वाचा - कोविड -19 मध्ये रक्ताची गुठळी का तयार होते ? संशोधक ही चक्रावले....

मुंबईतून गावाकडे येण्यासाठी अवघ्या तीन तासात पास मिळतो कसा याची चौकशी का होत नाही हा आमचा सवाल आहे. आम्ही विरोधक असलो तरी राजकारण करत नाही सहकार्याची आमची भूमिका आहे.

इथल्या जनतेच्या आयुष्यावर खेळू नका. जिल्ह्यातील लोकांनी आम्हाला खूप काही दिले आहे.आमच्यावर राग काढा पण जिल्ह्यासाठी काहीतरी करा. आज जिल्हा अडचणीत आहे. केरळच्या परिचारिकांना 20 लाखांचे पॅकेज दिले जाते. हा पैसा राज्य सरकारकडे असेल तर आमच्या लोकांसाठी तो पैसा का नाही ? गावातील नियंत्रण समितीला का पैसे देत नाहीत ? सरपंच आपल्या खिशातले पैसे खर्च करत आहेत याबाबत कोणता आराखडा आहे तुमच्याकडे ? असा सवालही उपस्थित करून राणे यांनी जिल्हा प्रशासनाला तसेच पालक मंत्र्यांनाही कैचीत पकडले आहे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nitesh rane criticized on administration in kankavli