नितेश राणेंची महावितरणला डेडलाइन 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 जुलै 2019

वैभववाडी - सतत खंडित होणारा वीजपुरवठा, जीर्ण खांब बदलण्यात होणारी टाळाटाळ, रखडलेली शेतीपंप जोडणी, अरुणा प्रकल्पग्रस्तांना जोडणी देताना होणारा विलंब यांसह विविध समस्या लोकांनी मांडल्यानंतर आमदार नितेश राणेंनी कार्यपद्धतीत सुधारणा करा, अशी सूचना करतानाच एक ऑगस्टपूर्वी सुधारणा न झाल्यास कार्यालयावर मोर्चा काढावा लागेल, असा इशारा आज अधिकाऱ्यांना दिला. 

वैभववाडी - सतत खंडित होणारा वीजपुरवठा, जीर्ण खांब बदलण्यात होणारी टाळाटाळ, रखडलेली शेतीपंप जोडणी, अरुणा प्रकल्पग्रस्तांना जोडणी देताना होणारा विलंब यांसह विविध समस्या लोकांनी मांडल्यानंतर आमदार नितेश राणेंनी कार्यपद्धतीत सुधारणा करा, अशी सूचना करतानाच एक ऑगस्टपूर्वी सुधारणा न झाल्यास कार्यालयावर मोर्चा काढावा लागेल, असा इशारा आज अधिकाऱ्यांना दिला. 

महावितरण आणि एसटी महामंडळाबाबत असलेल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी येथील नगरपंचायत कार्यालयात जनता दरबार झाला. यावेळी स्वाभिमानचे तालुकाध्यक्ष अरविंद रावराणे, नगराध्यक्ष दीपा गजोबार, उपनगराध्यक्ष रोहन रावराणे, उपसभापती हर्षदा हरयाण, नासीर काझी, जयेंद्र रावराणे, भालचंद्र साठे, दिलीप रावराणे उपस्थित होते. 

महावितरणबाबत असलेल्या विविध समस्यांचा पाढाच नानीवडे तिथवली, कोळपे, उंबर्डे भागातील नागरिकांनी आमदार राणेंसमोर वाचला. दहा वर्षांपूर्वीपासून तक्रारी करूनसुध्दा जीर्ण खांब बदलले जात नाहीत, शेतीपंप जोडण्यादेखील रखडल्या आहेत, कमी दाबाचा पुरवठा हा नित्याचाच झाला आहे आदी तक्रारी लोकांनी मांडल्या.

भुईबावडा उपविभागाच्या शाखा अभियंता ग्राहकांशी उद्धटपणे वागतात, एवढेच नाही लोकप्रतिनिधीकडे एखादा ग्राहक गेला तर त्याचे काम हेतुपुरस्सर अडवून ठेवतात. अरुणा प्रकल्पग्रस्तांना वीजजोडणी देताना टाळाटाळ केली जात आहे. त्यांच्याकडून बॉण्ड करून घेतला जातो. जनतेची हेटाळणी करणारा आम्हाला नको. त्या शाखा अभियंत्याची तत्काळ तेथून बदली करावी, अशी मागणी भालचंद्र साठे यांनी केली. 

यावेळी शाखा अभियंता सौ. इंदुलकर यांनी "बेकायदेशीर कामे होत नसल्यामुळे आपल्यावर वैयक्तिक आरोप केले जात आहेत. ज्यांचा असेसमेंट नाही त्यांच्याकडून बॉण्ड घेण्याचे परिपत्रक आहे. त्यानुसारच कार्यवाही केली जात आहे,' असे स्पष्टीकरण दिले. 

पावसाळ्यापूर्वी वीजवाहिन्यांवरील झाडीझुडपे तोडणे आवश्‍यक होते; परंतु प्रत्यक्षात ते काम झालेले नाही. त्या कामांवर खर्च झाला आहे, असा आरोप जयेंद्र रावराणे यांनी केला. याबाबत महावितरणचे उपविभागीय अधिकारी एन. व्ही. भगत यांनी झाडी तोडण्यासाठी एक लाख रुपयांची निविदा काढली होती, असे स्पष्ट केले. उंबर्डेतील मुख्यवाहिनी शेतातून गेली आहे. ती बदलावी, अशी मागणी सरपंच एस. एम. बोबडे यांनी केली.

सर्वांनी महावितरणबाबत समस्या मांडल्यानंतर आमदार राणेंनी अधिकाऱ्यांना कार्यपद्धतीत सुधारणा करा, येत्या पंधरा दिवसांत कामात सुधारणा करा, त्यानंतर एक ऑगस्टला कामाचा आढावा घेऊ. त्यात सुधारणा आढळली नाही तर मोर्चा काढला जाईल, असा इशारा दिला. 

हयात असेपर्यंत काम होऊ दे 
आठदहा वर्षे सतत पाठपुरावा केल्यानंतर चार महिन्यांपूर्वी वीज खांब उभे करण्यात आले; परंतु पुढील काम अजूनही करण्यात आलेले नाही. आम्ही हयात असेपर्यंत ते काम पूर्ण होऊ देत, अशी हतबल प्रतिक्रिया शहरातील ज्येष्ठ नागरिक शांताराम रावराणे यांनी व्यक्त केली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nitesh Rane give deadline to Mahavitran