आमदार नीतेश राणे यांना 9 जुलैपर्यंत पोलिस कोठडी

राजेश सरकारे
शुक्रवार, 5 जुलै 2019

कणकवली - आमदार नीतेश राणे यांच्यासह स्वाभिमान पक्षाच्या 18 कार्यकर्त्यांना कणकवली न्यायालयाने नऊ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या सर्वांना 9 जुलै रोजी पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. या सर्वांवर महामार्ग उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना धक्काबुक्की, चिखलाची अंघोळ आणि गडनदी पुलाला बांधून ठेवल्या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

कणकवली - आमदार नीतेश राणे यांच्यासह स्वाभिमान पक्षाच्या 18 कार्यकर्त्यांना कणकवली न्यायालयाने नऊ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या सर्वांना 9 जुलै रोजी पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. या सर्वांवर महामार्ग उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना धक्काबुक्की, चिखलाची अंघोळ आणि गडनदी पुलाला बांधून ठेवल्या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. तसेच काल सायंकाळी त्यांच्यासह 18 स्वाभिमान कार्यकर्त्यांना अटक केली होती. या सर्वांना आज दुपारी येथील न्यायालयात हजर करण्यात आले होते. 

आमदार नीतेश राणे यांना अटक केल्यानंतर प्रकृती अस्वस्थतेमुळे त्यांना उपजिल्हा रूग्णालयात ठेवण्यात आले होते. दुपारी एक वाजता श्री. राणे यांना पोलिस कोठडीत आणण्यात आले. तर दुपारी साडे तीन वाजता त्यांना कणकवली न्यायालयात हजर करण्यात आले.

यावेळी सरकारी पक्षाच्यावतीने अ‍ॅड. गजानन तोडकरी यांनी काम पाहिले. त्यांनी सात दिवसांची पोलिस कोठडी मागितली होती. तसेच पोलिस प्रशासनाच्यावतीने त्यांनी उपअभियंत्यांना मारण्यासाठी कट रचला गेला, अशी बाजू मांडली. हा कट कुठे रचण्यात आला. या कटासाठी वापरलेल्या गाड्या जप्त करावयाच्या आहेत. बादल्या जप्त करावयाच्या आहेत त्यामुळे सात दिवसांची पोलिस कोठडी आवश्यक असल्याचे न्यायालयाला सांगितले. 

आमदार नीतेश राणे यांच्यावतीने अ‍ॅड. विलास परब, अ‍ॅड. संग्राम देसाई, अ‍ॅड. उमेश सावंत, अ‍ॅड. राजेंद्र रावराणे यांनी युक्तीवाद केला. या सर्वांनी आपल्या युक्तीवादामध्ये महामार्गावरील खड्डयांमुळे कणकवलीकरांचे जगणे मुश्कील झाले आहे. याला जबाबदार असणार्‍यांवरही गुन्हे दाखल व्हायला हवे होते. त्याचा विचार कोण करणार, खड्डयांच्या समस्येमुळे कणकवलीकरांचा उद्रेक झाला. यात जे झालं तेच होणार होतं. या खटल्यातील आरोपी हे सामान्य नाहीत तर लोकप्रतिनिधी आहेत. हे सगळं रोजचं जगणं आम्ही अनुभवतो आहेत अशी बाजू मांडली. या  सुनावणीनंतर कणकवली न्यायालयाने आमदार नीतेश राणेंसह सर्व 18 जणांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. सरकारी पक्षाच्यावतीने अ‍ॅड.गजानन तोडकरी यांनी काम पाहिले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nitesh Rane police custody till 9th July