आचरा सरपंचावरील अविश्‍वास कायम

डॉ. सदानंद मोरे
गुरुवार, 10 नोव्हेंबर 2016

आता बसणाऱ्या सरपंचाला अंदाजे दीड वर्षाचा कालावधी मिळू शकतो. आगामी पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुका लक्षात घेऊन कॉंग्रेस, शिवसेना सरपंच निवड प्रतिष्ठेच्या करू शकतात. पण या अविश्‍वास ठरावामुळे आचरा ग्रामपंचायतीच्या इतिहासात सौ. साक्षी ठाकूर यांच्या प्रभारी सरपंचपदामुळे पहिल्या महिला सरपंच ठरल्या.

आचरा : येथील सरपंच मंगेश टेमकर यांच्या विरुद्ध अपर जिल्हाधिकारी यांच्या न्यायालयात 20 एप्रिलला ग्रामपंचायत सदस्यांनी दाखल केलेला अविश्‍वास ठराव विधिवत संमत झाल्याने हा ठराव कायम करण्यात येत असल्याचा निकाल देण्यात आला आहे. त्यामुळे गेले साडेसात महिने आचरा सरपंच निवडीचा रेंगाळलेला प्रश्‍न आता मार्गी लागणार आहे.

टेमकर यांच्या अविश्‍वास ठरावावेळी करण्यात आलेली कॉंग्रेस, शिवसेनेची अनोखी युती सरपंच निवडीवेळी कायम राहणार का, याबाबत सर्वांमध्ये औत्सुक्‍य आहे. ही युती कायम राहिल्यास सरपंच कॉंग्रेसचा बसणार, की शिवसेनेचा याबाबतही उत्सुकता लागून राहिली आहे.

आचरा सरपंच मंगेश टेमकर हे मनमानी कारभार करत असल्याचा आरोप करत ग्रामपंचायत सदस्यांनी एप्रिल महिन्यात त्यांच्याविरूद्ध अविश्‍वास ठराव संमत केला होता. याला टेमकर यांनी न्यायालयात आव्हान दिले होते. त्यामुळे गेले साडेसात महिने ग्रामपंचायतीचा कारभार प्रभारी सरपंच साक्षी ठाकूर या सांभाळत होत्या. या ग्रामपंचायतीत तेरा सदस्य असून यात कॉंग्रेसचे सहा शिवसेना व गाव पॅनेलचे पाच तर राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत दोन सदस्यांचा समावेश आहे. टेमकर यांच्याविरुद्ध अविश्‍वास ठरावावेळी कॉंग्रेस आणि शिवसेनेची न होणारी युती ग्रामपंचायतीमध्ये दिसून आली होती. टेमकर यांनी न्यायालयात दाखल केलेले अपील ग्राह्य न धरता ग्रामपंचायत सदस्यांनी संमत केलेला ठरावच विधिवत असल्याचे नमूद करत कायम ठेवल्याने आता लवकरच आचरा सरपंच निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे आता सरपंचपदी कोण बसणार, हा औत्सुक्‍याचा विषय बनला आहे. संख्याबळाचा विचार करता या ग्रामपंचायतीवर कॉंग्रेसचा सरपंच बसण्याची शक्‍यता नाकारता येणार नाही.
कॉंग्रेसचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आणि माजी सरपंच राजन गावकर यांनी अविश्‍वास ठरावानंतर तातडीने आपण सरपंचपदासाठी इच्छुक नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे कॉंग्रेसने सरपंचपदासाठी जोर धरल्यास अवधूत हळदणकर किंवा चंदन पांगे यांचे नाव पुढे येऊ शकते. शिवसेनेतर्फे श्रद्धा सक्रू यांचे नाव पूर्वीपासून चर्चेत आहे. त्यांना त्यांच्याच पक्षातील सीमा घाडी किंवा रेश्‍मा कांबळी यांचे आव्हान असू शकते. या इच्छुकांमध्ये सध्या प्रभारी कार्यभार सांभाळणाऱ्या साक्षी ठाकूर याही दावा करू शकत असल्याने सरपंचपदी कोण बसणार, हे आगामी काळात स्पष्ट होईल.

 

Web Title: no confidence on achara sarpanch