डाॅ. आंबेडकर यांचे आंबडवे गाव पंचतीर्थ घोषित पण... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

No Development In Dr Babasaheb Ambedkar Village Ambdave

केंद्र सरकारने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी संबंधित ऐतिहासिक स्थळे यामध्ये जन्मस्थळ महू, मुंबईतील इंदू मिल, लंडन येथील निवासस्थान, दिल्लीतील 26 अलीपूर रोड आणि मूळगाव आंबडवे यांचा पंचतीर्थात समावेश करून विकास करण्याचे ठरविले. 

डाॅ. आंबेडकर यांचे आंबडवे गाव पंचतीर्थ घोषित पण...

मंडणगड ( रत्नागिरी ) - स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या त्रिसूत्रीवर आधारित देशाला राज्यघटना देणारे महामानव डॉ. बाबासाहेब आबेडकर यांचे पंचतीर्थ म्हणून घोषित झालेले मूळगाव आंबडवे आजही दुर्लक्षितच राहिले आहे. आदर्श संसद ग्राम निवड ही देखील पाच वर्षानंतर कागदावरच आहे. त्यामुळे आंबडवेबाबत फक्त घोषणाबाजी झाली. महामानवाच्या गावाला विकासाच्या माध्यमातून न्याय कधी मिळणार, असा सवाल स्थानिक ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत. 

केंद्र सरकारने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी संबंधित ऐतिहासिक स्थळे यामध्ये जन्मस्थळ महू, मुंबईतील इंदू मिल, लंडन येथील निवासस्थान, दिल्लीतील 26 अलीपूर रोड आणि मूळगाव आंबडवे यांचा पंचतीर्थात समावेश करून विकास करण्याचे ठरविले. आदर्श संसद ग्राम योजनेअंतर्गत या गावाची खासदार अमर साबळे यांनी निवड केली. मात्र, साऱ्या मानव जातीला ज्यांनी आपल्या विकासाभिमूख, सुधारक नेतृत्वाने भूरळ घातली ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंबडवे हे मूळ गाव आजही विकासापासून दूरच आहे. गावात कुठल्याही प्रकारचे काम अद्यापही सुरू करण्यात आलेले नाही. आदर्श संसद ग्राम योजनेंतर्गत सुमारे 373 कोटींचा विकास आराखडा बनविण्यात आला. त्याच्या घोषणाही करण्यात आल्या. त्यात शिल्पसृष्टी, ग्रंथालय, सामाजिक सभागृह तसेच स्मारक परिसरात भौतिक सुविधा उपलब्ध करण्यात येणार होत्या. मात्र, घोषणेची अमंलबजावणी करण्यात केंद्र सरकारला अपयश आल्याचे दिसून येते. 6 डिसेंबरला महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर जागृती मंडळ आंबडवे या स्थानिक ट्रस्टच्या वतीने स्मारकाला रंगरंगोटी करण्यात आली आहे. 

हेही वाचा - मालवणात उलटली पर्यटक नाैका; मुंबईतील वृद्धा ठार 

निविदा भरत नसल्याचे उत्तरे 

आंबडवे येथील कामांसाठी आदर्श संसद ग्राममधून वीस कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मात्र, कुणी निविदाच भरल्या नसल्याचे अर्थहीन उत्तरे लोकप्रतिनिधी मार्फत मिळत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. तीन शौचालय व एकच न्हाणीघर असल्याने येणाऱ्या हजारों अनुयायी व पर्यटकांची कुचंबणा होत असून त्यामुळे या स्थळी भेट देणाऱ्या संख्येवर त्याचा परिणाम होवू लागला आहे. 

घोषणांची अंमलबजावणी केव्हा ?
आंबडवेबाबत करण्यात आलेल्या घोषणांची अंमलबजावणी होत नाही. लोकप्रतिनिधी, अधिकारी फक्त भेट देवून आश्वस्त करतात. मात्र, अपेक्षित काहीही घडत नाही. आदर्श संसद ग्राम योजनेअंतर्गत होणाऱ्या कामांवर जेव्हा निधी खर्च पडेल, तेव्हाच प्रशासन आणि शासनावरचा विश्वास दृढ होईल. 
-सुदामबाबा सकपाळ, ज्येष्ठ ग्रामस्थ, आंबडवे.