संघर्षच! रानोमाळ, दूर जंगलात शोधूनही सापडेना, कसा होणार ऑनलाईन अभ्यास?

सुरेश बागवे
Sunday, 13 September 2020

गावात मोबाईल नेटवर्कची तर वानवाच. अशा कठीण परिस्थितीत अंकिताचा ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू झाला; परंतु इंटरनेट नेटवर्कच नसल्याने अभ्यासात मोठा अडथळा निर्माण होत आहे.

कडावल (सिंधुदुर्ग) - कोरोना संकटामुळे ती मुंबईहून आपल्या गावी किनळोस येथे आली. बीएस्सी आयटीमध्ये अंतिम वर्षाचे शिक्षण घेतेय. ऑनलाईन अभ्यासक्रमही सुरू झालेत; परंतु इंटरनेटचे काय? इंटरनेट उपलब्ध होत नसल्याने दूर जंगलात जाऊन तिचा इंटरनेटचा शोध सुरू आहे. एखाद्या टेकडीवर रेंज मिळाली तरच तिचा ऑनलाईन अभ्यास सुरू होतो; अन्यथा बहुतेक वेळी मोबाईल खिशात घालून रित्या हातानं व निराश मनानं घरी परतावे लागतेय. 

किनळोस (ता. कुडाळ) हे एक लहानसे खेडेगाव. चारही बाजूंनी डोंगररांगांनी व्यापलेले हे गाव निसर्ग आणि जैवविविधतेने परिपूर्ण असले तरी आधुनिक सुविधांपासून मात्र वंचित आहे. गावात मोबाईल नेटवर्कची तर वानवाच. अशा कठीण परिस्थितीत अंकिताचा ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू झाला; परंतु इंटरनेट नेटवर्कच नसल्याने अभ्यासात मोठा अडथळा निर्माण होत आहे. नेटवर्क मिळेल या आशेने घरापासून दूरच्या जंगलात निर्जनस्थळी तिला जावे लागत आहे. केव्हातरी नेटवर्क मिळाले तर तिचा अभ्यास सुरू होतो; अन्यथा निराश होऊनच घरी परतावे लागत आहे. 

हिर्लोक येथील टॉवर चुकीचा 
किनळोस व हिर्लोक या दोन गावांसाठी एक ग्रामपंचायत आहे. हिर्लोक येथे बीएसएनएल व जीओ या कंपन्यांचे टॉवर आहेत. हे दोन्ही टॉवर सखल भागात मानवी वस्तीनजीक आहेत. या टॉवर्समुळे हिर्लोकला नेटवर्क उपलब्ध होते; परंतु किनळोसला फायदा नाही. हे दोन्ही टॉवर जर हिर्लोक व किनळोस दरम्यान असलेल्या भिके डोंगरीत असते तर दोन्ही गावांना नेटवर्क उपलब्ध झाले असते. 

"त्या' घोषणेचं काय? 
तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी येथील विद्यार्थ्यांसाठी एक लाख इंटरनेट कनेक्‍शन देण्याची घोषणा केली होती. सावंतवाडी येथे या योजनेचे वाजतगाजत उद्‌घाटन झाले. इच्छुकांकडून अर्जही भरून घेण्यात आले; परंतु या योजनेचे पुढे काय झाले?, जिल्ह्यातील किती विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ मिळाला? वास्तविक ही योजना हिताची होती. घोषणा अनेक होतात; परंतु किती पूर्ण होतात, हा संशोधनाचा विषय. 

शैक्षणिक भवितव्य अधांतरी 
किनळोसमध्ये विविध क्षेत्रातील किमान 28 विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांचा ऑनलाईन अभ्यासक्रमही सुरू झाला आहे; मात्र इंटरनेट नसल्यामुळे त्यांचा जीव टांगणीला लागला आहे. गावातील बहुतेक सर्वच विद्यार्थ्यांना ही समस्या आहे. "डिजिटल भारत'ची हाक देणाऱ्या नेतृत्वाने याची दखल घ्यावी, शिक्षणाचा मार्ग सुकर करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. 

संपादन- राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: no internet access kinlos konkan sindhudurg