"ती' शेतकरी रॅली नव्हे तर भाजपचा मेळावा ः डॉ. जयेंद्र परुळेकर

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 7 January 2021

श्री. परुळेकर यांनी येथील आमदार दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकार आणि आजच्या भाजपच्या जिल्ह्यातील ट्रॅक्‍टर रॅलीवर जोरदार टीका केली. यावेळी उपजिल्हाप्रमुख अशोक दळवी, उपजिल्हा संघटक शब्बीर मणियार उपस्थित होते.

सावंतवाडी ( सिंधुदुर्ग ) - जिल्ह्यात भाजपच्या वतीने काढण्यात आलेली आजची शेतकरी ट्रॅक्‍टर रॅली नव्हती तर भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा होता. या रॅलीने भाजपाने फक्त नौटंकी केली, अशी टीका शिवसेनेचे जिल्हा प्रवक्ते डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी केली. 

श्री. परुळेकर यांनी येथील आमदार दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकार आणि आजच्या भाजपच्या जिल्ह्यातील ट्रॅक्‍टर रॅलीवर जोरदार टीका केली. यावेळी उपजिल्हाप्रमुख अशोक दळवी, उपजिल्हा संघटक शब्बीर मणियार उपस्थित होते.

श्री. परुळेकर म्हणाले, ""26 नोव्हेंबरपासून किसान आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचा आजचा 46 वा दिवस असून अनेक राज्यातील शेतकरी ठिय्या मांडून आहेत. अनेक देशातही या किसान आंदोलनाचे पडसाद उमटू लागल्याने केंद्र सरकार हादरले आहे आणि म्हणूनच केंद्र सरकारने काढलेल्या शेतकरी विधेयक कायदा शेतकऱ्यांच्या हिताचा असल्याचे आणि शेतकरी आपला सोबत आहेत असे भासवण्यासाठी संपूर्ण राज्यात आणि राज्यातील जिल्ह्यांमध्ये भाजपकडून ट्रॅक्‍टर रॅली काढून नौटंकी सुरू आहे. त्याचाच भाग म्हणजे आज भाजपकडून कणकवली येथे ट्रॅक्‍टर रॅली काढली आहे.

कणकवली येथे आजचे ट्रॅक्‍टर रॅली आंदोलन पाहता नौटंकी होती. यामध्ये भाजपचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात होते. भाड्याचे ट्रॅक्‍टर व भाडोत्री लोक आणून याठिकाणी चित्र उभं करण्यात आले; मात्र जनता या सर्व प्रकाराला ओळखून आहे.'' 

"" केंद्र सरकारने आणलेले किसान विधेयक शेतकऱ्यांच्या हिताचे नसून शेतकऱ्यांच्या जमिनी बड्या उद्योजकांच्या घशात घालवण्याचा डाव आहे. आज या विधेयकाच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या 30 शेतकऱ्यांचे जीव गेले; मात्र असे असूनही केंद्र सरकारला शेतकऱ्यांची कीव येत नाही हे दुर्दैव आहे.'' 
- डॉ. जयेंद्र परुळेकर 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No Its not Farmers Rally It is BJP conference Jayendra Parulekar comment