
मालवण (जि. सिंधुदुर्ग) : पारंपरिक मच्छीमारांकडून सातत्याने अनधिकृत पर्ससीनधारकांवर कारवाईची मागणी केली जात आहे. प्रत्यक्षात आम्ही अधिकृत पर्ससीनधारक असून, आमच्याकडे मासेमारीचा परवाना आहे, तसेच 12 नॉटिकलच्या बाहेर मासेमारी करण्याचा अधिकार कायद्यानुसार प्राप्त आहे. घटनेने आम्हाला जो अधिकार दिला आहे, तो हिरावून घेण्याचे काम केले जात असून, ते चुकीचे आहे. आमचे पारंपरिक मच्छीमारांशी वैर नाही; मात्र आम्हाला कायद्यानुसार अधिकार मिळाला आहे. त्यानुसारच आम्ही व्यवसाय करत आहोत. त्यामुळे पारंपरिक मच्छीमारांनी कायदा समजून घ्यावा, असे मत पर्ससीन व्यावसायिक अशोक सारंग यांनी सोमवार पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
यावेळी रेहान शेख, जॉन नर्होंना, अमित गावकर, मुजफ्फर मुजावर, पास्कोल पिंटो, ओंकार खांदारे, गौरव प्रभू, रुजारिओ पिंटो, सहदेव बापर्डेकर, इलियास होलसेकर, श्रीपाद पाटकर, हनीफ मेमन, श्री. कोयंडे, गोपी तांडेल, आबा बापर्डेकर, श्री. मेमन, रिहान मुजावर, प्रवीण कांदळगावकर, श्री. पारकर आदी पर्ससीन व्यावसायिक उपस्थित होते.
श्री. सारंग म्हणाले, "आम्ही आधुनिक पद्धतीने मासेमारी करत असून पारंपरिक मच्छीमार आमच्या विरोधात उपोषणाला बसले आहेत. एलईडी मासेमारीला बंदी घालण्यात यावी, अशी त्यांची मागणी आहे. आमचा त्यांना विरोध नाही. सागरी मासेमारी अधिनियम 1981 कायद्यानुसार 12 नॉटीकलच्या बाहेर आम्हाला मासेमारी करण्याचा अधिकार आहे. आम्ही अनधिकृत नसून अधिकृत पर्ससीनधारक आहोत. त्यामुळे आम्हाला प्रतिबंध करणे चुकीचे आहे. आम्हाला कायद्याने मासेमारी करण्याचा अधिकार आहे. कोणाच्या दबावाखाली मत्स्य व्यवसाय कारवाई करत असेल तर ते चुकीचे आहे.''
ते म्हणाले, ""पारंपरिक मच्छीमारांनी नेमका कायदा काय आहे, याचा अभ्यास करावा. पारंपरिक मच्छीमारांचे उपोषण सिंधुदुर्गापुरतेच मर्यादित आहे का, जो कायदा आहे, तो संपूर्ण राज्यासाठी लागू करावा. आम्ही चोरी करत नाही. काळानुसार आम्ही प्रगती साधली आहे; मात्र जे पारंपरिक मच्छीमार आहेत, ते अत्याधुनिक साधनांचा वापर करत असतील, तर त्यांना पारंपरिक म्हणता येईल का, याचाही विचार व्हायला हवा. ते आम्हाला अनधिकृत ठरवित असतील तर त्यांनीही कायद्याचे पालन करायला हवे. मासेमारी बंदी कालावधीत पारंपरिक मच्छीमारांकडूनच मासेमारी होते. त्यामुळे त्यांनी याचा प्रथम खुलासा करावा. स्थानिक आमदार हे राज्याचे प्रतिनिधीत्व करतात. त्यामुळे मासेमारी करणाऱ्या सर्वांची भूमिका जाणून घ्यायला हवी. त्यांनी हलक्या कानाचे असू नये. त्यांनी मासेमारीच्या कायद्याचा सखोल अभ्यास करावा आणि त्यानंतरच आपली मते मांडून निर्णय घ्यावा. केवळ एक गठ्ठा मतदानाचा विचार करून निर्णय घेऊ नये.''
एकीकडे व्यासपीठावरून राजकीय लोकप्रतिनिधी मच्छीमारांना प्रगती करायला सांगतात आणि दुसरीकडे जे या व्यवसायात प्रगती करत आहेत, त्यांच्याविरोधात भूमिका मांडतात. त्यामुळे सरकारची ही भूमिका इंग्रजांपेक्षा घातक आहे. पारंपरिक मच्छीमार व पर्ससीनधारक यांच्यात गैरसमज करून आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न राजकीय लोकप्रतिनिधींकडून सातत्याने केला जात आहे, असा आरोप श्री. सारंग यांनी केला.
शासनाने पूर्वीप्रमाणेच आम्हा पर्ससीनधारकांना शून्य नॉटिकल ते 12 नॉटिकल अंतरात मासेमारी करण्याची परवानगी द्यावी. आम्ही एलईडी पद्धतीने मासेमारी बंद करू, असे श्री. तांडेल यांनी स्पष्ट केले.
अनाठायी विरोध करू नये!
एलईडीची मासेमारी पारंपरिक मासेमारीची पद्धत असून, ती घातक नाही. त्याबाबतचा कोणताही अहवाल शासनाकडे उपलब्ध नाही. अनियंत्रित मासेमारी हा गैरसमज आहे. काळाची पावले ओळखून प्रगती करणे आवश्यक आहे. पारंपरिक मच्छीमार प्रगती करतात, हे कौतुक आहे; मात्र त्यांनी आम्हाला अनाठायी विरोध करू नये, असे श्री. सारंग म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.