चिपळूण शहरात असुरक्षित एटीएममुळे कोरोनाचा धोका 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 20 October 2020

एटीएममध्ये स्वच्छता नावाला नाही. सॅनिटायझर उपलब्ध नाही. तापमान मोजणारे यंत्र नाही. सुरक्षारक्षक नाही. नागरिक नाक आणि तोंडाला मास्क लावून एटीएम सेंटरमध्ये येतात. एखाद्याने मास्क लावला नाही म्हणून त्याला एटीएम सेंटरमध्ये प्रवेश नाकारणारा कोणी नाही.

चिपळूण ( रत्नागिरी ) - चिपळूण शहर आणि उपनगरात कोरोना काळात एटीएम सेंटरमध्ये सुरू असलेल्या आर्थिक व्यवहारादरम्यान नागरिकांनी सर्वच नियम पायदळी तुडवले आहेत. दुर्दैव म्हणजे हाताच्या बोटांवर मोजण्याएवढ्या बॅंका सोडल्या तर उर्वरित बॅंकांनी याकडे पूर्णतः दुर्लक्ष केले आहे. परिणामी कोरोनाचा प्रसार होण्याची शक्‍यता अधिक आहे. 

चिपळूण शहर, बहादूरशेख नाका, खेर्डी परिसरात एटीएम आहेत. शहर आणि उपनगरातील एटीएम सेंटरमध्ये आठवड्यातून एकदा रोख रक्कम भरावी लागते. त्या वेळी एटीएम स्वच्छ आणि सुरक्षित आहे की नाही, हेही पाहावे लागते. ग्राहकांसाठी नोटीस लावली जाते. एटीएम सेंटरमध्ये सॅनिटायझर लावले जाते. अनेक ठिकाणी सुरक्षारक्षक असतात. ते एटीएमसह ग्राहकांजी काळजी घेतात. बहुतांश एटीएममध्ये कोरोनाचे नियम धाब्यावर बसवले आहेत.

एटीएममध्ये स्वच्छता नावाला नाही. सॅनिटायझर उपलब्ध नाही. तापमान मोजणारे यंत्र नाही. सुरक्षारक्षक नाही. नागरिक नाक आणि तोंडाला मास्क लावून एटीएम सेंटरमध्ये येतात. एखाद्याने मास्क लावला नाही म्हणून त्याला एटीएम सेंटरमध्ये प्रवेश नाकारणारा कोणी नाही. रोखणारा कोणी नसल्यामुळे सामाजिक अंतर ठेवून एटीएम सेंटरमध्ये प्रवेश करण्याचा नियम तर ग्राहकांनी पायदळी तुडवला आहे. कोरोना काळात एटीएम हाताळताना आवश्‍यक असलेल्या आरोग्याच्या सुरक्षेला तिलांजली दिली आहे. 

या ठिकाणी होतोय दुर्लक्ष 
बहादूरशेख नाका येथे बॅंक ऑफ महाराष्ट्राचे एटीएम सेंटर आहे. या एटीएम सेंटरमध्ये कधी कॅशचा तुटवडा असतो तर कधी नेट कनेक्‍टिव्हिटी गेलेली असते. मार्कंडी येथील आयडीबीआय बॅंकेचे एटीएम सेंटरही गेले काही दिवस बंद आहे. एसटी बसस्थानकाच्या मागील बाजूस असलेले बॅंक ऑफ इंडियाचे एटीएम अनेक दिवसांपासून बंद आहे. या तिन्ही ठिकाणच्या एटीएम सेंटरमध्ये कोरोनासंदर्भात कोणतीही काळजी घेतलेली दिसत नाही. 

 

एटीएम सेंटर आणि बॅंकांच्या बाहेर आरोग्याची काळजी घेण्याबाबतच्या सूचना दिलेल्या असतात. त्यांची अंमलबजावणी केवळ बॅंकांच्या बाहेर होते. एटीएम सेंटरच्या ठिकाणी हे नियम पायदळी तुडविले जातात. 
- संतोष होळकर, खेर्डी 

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेने सर्व बॅंकांना काळजी घेण्याच्या सूचना केल्या आहेत. मात्र अजूनही त्याचे काटेकोरपणे पालन होताना दिसत नाही. संसर्गाची साखळी तोडण्यासाठी सॅनिटायझेशन महत्त्वाचे आहे. 
- हरी यादव, चिपळूण 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No Precaution Taken To Prevent Corona On ATM Center In Chiplun City