
सिंधुदुर्ग - जिल्ह्यात किंबहूना पूर्ण कोकणात आरोग्य सुविधा हा कधी प्राधान्याचा मुद्दा नव्हताच. विस्कळीत, नियोजनशुन्य आरोग्य सुविधा जोतो सत्ताधारी आपल्या काळात पसरवत गेला. जिल्हाभर आरोग्य केंद्र, उपकेंद्र, रूग्णालये, विसावत गेली; पण यात सुविधा कशा निर्माण करायच्या व त्यात सातत्य कसे राखायचे याचा विचारच झाला नाही. साहजिक यातील बहुसंख्य इमारती आज केवळ बोर्ड मिरवण्यापुरत्या आहेत. येथील आरोग्य यंत्रणेला नवसंजीवनी देण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि पर्यायाने येणारे सुसज्ज रूग्णालय ही संकल्पना गेल्या तीन वर्षात जिल्ह्यात मूळ धरू लागली. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी ही मागणी मान्य करण्याची ग्वाही दिली जिल्ह्याचे हेल्थकार्ड किमान काठावर उत्तीर्ण ठरविण्यासाठी यावर कृतीची गरज आहे. कारण हा विषय लोकांच्या जगण्या-मरण्याशी संबंधित आहे.
कोकणवर मागासलेपणाचा शिक्का दीर्घकाळ होता. येथे विकासासाठी अनेकांनी प्रयत्न केले. सुरूवातीच्या काळात गावात रस्ता, एसटी, वीज आणि शाळा अशी कोकणातील गावागावांत विकासाची चौकोनी अपेक्षा होती. सुविधा होत गेल्या तशा या अपेक्षाही विस्तारत गेल्या; मात्र आरोग्यसुविधा या गरजेकडे फारसे गांभिर्याने पाहिले गेले नाही. यामुळे पूर्ण कोकणातच आरोग्यासाठी दुसऱ्यावर अवलंबून राहण्याची वेळ आजही कायम आहे. यातील सिंधुदुर्गाला तर लगतच्या गोव्यातील सुविधांच्या उपकारावर अवलंबून राहावे लागत आहे.
सिंधुदुर्गात आरोग्यासाठी आतापर्यंत करोडो रूपये खर्च झाले. पण यातून निर्माण झालेल्या सुविधा फारशा डोळस नाहीत. जवळपास प्रत्येक गावात आरोग्य उपकेंद्र, पंचक्रोशीत प्राथमिक आरोग्य केंद्र याच्या जोडीनेच बरीच उपजिल्हा, ग्रामीण रूग्णालये उभी राहिली. जिल्ह्याच्या मुख्यालयात जिल्हा रूग्णालय थाटण्यात आले. इतके असूनही जिल्ह्यात गंभीर रूग्णांवर उपचार करण्याची क्षमता या करोडोंच्या इमारतींमध्ये नाही. कारण या सुविधा उभारताना त्यात तज्ञ डॉक्टर, सक्षम यंत्रणा कायमस्वरूपी राहील असे नियोजन होताना दिसत नाही. याचा फटका सर्वसामान्यांना बसतो.
यातून मार्ग काढण्यासाठी सिंधुदुर्गात गोव्यातील गोमॅको अर्थात गोवा मेडिकल कॉलेजच्या धर्तीवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारावे. जेणेकरून येथे पाचशे खाटांचे सुसज्ज रूग्णालय, विविध प्रकारच्या लॅब आणि महत्त्वाचे म्हणजे वैद्यकीय महाविद्यालय असल्याने तज्ञ डॉक्टर, तंत्रज्ञान उपलब्ध होतील अशी संकल्पना सगळ्यात आधी 2015 मध्ये सकाळमधून मांडली गेली. याचा सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. यामुळे जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारणीसाठी दबावगट निर्माण करण्याच्या हेतूने कृती समिती स्थापन झाली. त्यांनी विविध मार्गाने शासनाचे लक्ष वेधले. तत्कालीन मुख्यमंत्र्यांना जिल्हावासियांनी 25 हजारपेक्षा जास्त पत्रे पाठवून ही मागणी मांडली. तब्बल 126 ग्रामसभा, 3 पंचायत समित्या, 3 पालिका यांनी एकमुखाने ठराव घेत मेडिकल कॉलेजचा विषय लावून धरला. याचा परिणाम म्हणून मागिल सरकारने केंद्राकडे याबाबत पाठपुरावा केला. केंद्राने जिल्हा रूग्णालयाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा दर्जा देण्याबाबत पत्र काढले. पुढे या महाविद्यालय उभारणीसाठी समन्वयक नेमण्याची गरज होती. ती प्रक्रिया मात्र झाली नाही.
आता कोरोनामुळे वैद्यकीय सुविधांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सिंधुदुर्गासाठीच्या कोरोना लॅब उद्घाटनावेळी जिल्ह्याला वैद्यकीय महाविद्यालय देण्याची ग्वाही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिली. पालकमंत्री उदय सामंत यांनी महिन्याभरात याबाबतचा प्रस्ताव राज्याला देणार असल्याचे स्पष्ट केले.
इतकी प्रक्रिया झाली असली तरी प्रत्यक्ष मेडिकल कॉलेज कमी वेळात साकारणे सोपे नाही. त्याची गरज मात्र तातडीने आहे. यासाठी मुख्यमंत्री ठाकरे आणि सर्वच सत्ताधाऱ्यांनी प्रबळ राजकीय इच्छाशक्ती दाखवण्याची गरज आहे. पालकमंत्री सामंत यांनी रत्नागिरीच्या कोरोना लॅब उद्घाटनावेळी सिंधुदुर्गाबरोबरच रत्नागिरीलाही मेडिकल कॉलेज व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली होती. त्यात गैर काहीच नाही; मात्र सुविधांचा आणि भौगोलिक स्थितीचा विचार करता सिंधुदुर्गाला प्राधान्य मिळणे आवश्यक आहे. कारण जिल्हा पूर्णतः दुसऱ्या राज्यावर अवलंबून आहे. तेथे अक्षरशः उपकार केल्यासारखी वागणूक जिल्हावासियांना मिळते.
..तर आणखी एक "आरोग्य स्मारक'
रत्नागिरी-सिंधुदुर्गाची मागणी लक्षात घेता जिल्ह्याच्या सिमेवर हा प्रकल्प उभारण्याचा विचारही पुढे येवू शकतो; मात्र तो कितपत व्यवहार्य आहे हे ही तपासायला हवे. कारण मेडिकल कॉलेज उभारणीसाठी तेथे पाचशे खाटांचे रुग्णालय तीन वर्ष चालवले पाहिजे, अशी अट आहे. जिल्हा रूग्णालयाच्या ठिकाणी हा प्रकल्प उभारणे सध्याच्या घडीला जास्त सोपे आहे. कारण केंद्राकडून त्याला हिरवा कंदीलही मिळाला आहे. असे सुसज्ज रूग्णालय जिल्ह्याच्या मध्यवर्ती असल्यास कमी वेळात रूग्ण कितपर्यंत पोहोचू शकतो याचाही विचार करणे आवश्यक आहे. मेडिकल कॉलेज हा सर्वसामान्य सिंधुदुर्गवासियांच्या जगण्या-मरण्याशी संबंधित प्रकल्प आहे. तो उभारताना येथील सर्वसामान्य लोकांना केंद्रस्थानी मानून तो मार्गी लावणे आवश्यक आहे. अन्यथा जिल्ह्यात कोट्यावधी खर्चून आणखी एक आरोग्य स्मारक उभे राहण्याची भीती आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.