पूरस्थितीमुळे `या` तालुक्यात 115 घरांना स्थलांतराची नोटीस 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 5 August 2020

कसबा गावातील 55 घरांना धोक्‍याची नोटीस दिली आहे. तसेच 5 घरांमध्ये पुराचे पाणी घुसले. असुर्डे येथील काही घरांनाही धोक्‍याचा इशारा दिला आहे तर फुणगुसमधील दुकाने आणि काही रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलविले आहे.

संगमेश्‍वर ( रत्नागिरी ) - तालुक्‍यात सलग तीन दिवस कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे संगमेश्‍वर तालुक्‍यात पूरस्थिती निर्माण झाली. महामार्गावरील बावनदी पूल वाहतुकीसाठी बंद केला असून, महामार्गावरील सोनवी, शास्त्री, आरवली पुलांवर पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. या पुलांवरून एकेरी वाहतूक सुरू आहे. 

फुणगूस, वांद्री, कसबा, माखजन बाजारपेठांना पुराच्या पाण्याचा वेढा बसला आहे. पुराचे पाणी नदीकाठच्या गावांत शिरले आहे. गेले सलग तीन दिवस मुसळधार पावसाने तालुक्‍याला झोडपून काढले आहे. शास्त्री, सोनवी, असावी, गड, बावनदीचे पुराचे पाणी लगतच्या गावांतून घुसले. शास्त्री नदीचे पाणी घुसून आठवडा बाजारपेठेतील घरे व दुकाने पाण्याखाली गेली आहेत.

मंगळवारी संध्याकाळी पुराचे पाणी रामपेठ आणि संगमेश्‍वर आठवडा बाजारपेठेतील काही घरांमध्ये घुसले होते. रामपेठ व आठवडा बाजारपेठेतील 60 घरांना नोटीस देऊन स्थलांतर करण्यास सांगितले होते. सलग दुसऱ्या दिवशी बुधवारीही आठवडा बाजार व रामपेठमधील काही घरांमध्ये पाणी घुसले. त्यामुळे रामपेठवासीयांनी रात्र जागूनच काढली.

कसबा गावातील 55 घरांना धोक्‍याची नोटीस दिली आहे. तसेच 5 घरांमध्ये पुराचे पाणी घुसले. असुर्डे येथील काही घरांनाही धोक्‍याचा इशारा दिला आहे तर फुणगुसमधील दुकाने आणि काही रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलविले आहे.

वांद्री बाजारपेठेलाही पुराचा फटका बसला असून, वांद्री बाजारपेठेतील काही घरे पाण्याखाली गेली आहेत. अलकनंदा नदीला पूर आल्याने चालुक्‍य राजवटीतील मंदिरे पाण्याखाली गेली. नायरी खोऱ्यातील नायरी खोऱ्यातील फणसवणे, कसबा, शृंगारपूर, उमरे, कळंबस्ते आदी गावांतील संपर्क तुटला.

या मार्गावर वाहनांची कसबा लेडी येथे रांग लागली होती. परचुरी गावाला जोडणारा कोळंबे परचुरी पूल पाण्याखाली गेला. परचुरी गावातील वाड्यांचा संपर्क तुटला. तसेच शिवने पुलाच्या दोन्ही बाजूला पुराचे पाणी साचल्याने या गावातील संपर्क तुटला आहे. संगमेश्‍वर बाजारपेठेतून असुर्डे गावाकडे जाणाऱ्या वाहतुकीवर परिणाम झाला. 

चाकरमान्यांचे मोठे हाल 

नायरी खोरे, फुणगूस, डिंगणी रस्त्यासह बावनदी पुलावरील वाहतूक बंद केल्याने संगमेश्‍वर बसस्थानकात अनेक बसेस थांबविल्या होत्या. बाहेरगावातून आलेल्या चाकरमान्यांचे मोठे हाल झाले. अनेक बसेस रद्द कराव्या लागल्या.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Notice Of Migration To 115 Homes In Sangmeshwar Taluka