esakal | एसटीत आता "डीप क्‍लीन' संकल्पना; अभिजीत भोसले यांची माहिती
sakal

बोलून बातमी शोधा

Now the concept of Deep Clean in ST information by Abhijeet Bhosale

एसटीचे जनसंपर्क अधिकारी भोसले हे कोकण दौऱ्यावर असून त्यांनी आज येथील एसटी डेपोला भेट दिली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आगार व्यवस्थापक वैभव पडोळे, शिवसेनेचे एसटी कामगार सेना तालुकाध्यक्ष चंद्रकांत कासार उपस्थित होते.

एसटीत आता "डीप क्‍लीन' संकल्पना; अभिजीत भोसले यांची माहिती

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

सावंतवाडी ( सिंधुदुर्ग ) - कोरोना काळामध्ये डबघाईला आलेली एसटी व्यवस्था सुरळीत करण्यासाठी आणि प्रवासी वर्गाचा कल एसटीकडे वळवण्यासाठी यापुढे एसटीकडून "डीप क्‍लीन' ही संकल्पना राबवण्यात येणार असल्याची माहिती एसटीचे राज्य जनसंपर्क अधिकारी अभिजीत भोसले यांनी दिली. त्यांनी आज येथील एसटी डेपोला भेट देऊन तशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. 

एसटीचे जनसंपर्क अधिकारी भोसले हे कोकण दौऱ्यावर असून त्यांनी आज येथील एसटी डेपोला भेट दिली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आगार व्यवस्थापक वैभव पडोळे, शिवसेनेचे एसटी कामगार सेना तालुकाध्यक्ष चंद्रकांत कासार उपस्थित होते.

श्री. भोसले म्हणाले, ""कोरोनामुळे एसटीचा आर्थिक कणा मोडला आहे. त्यामुळे काही अंशी एसटी तोट्यात सुरू असून हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत आहे; मात्र असे असले तरी प्रवासी वर्गाचा एसटीकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा काहीअंशी साशंक आहे. त्यामुळे हवा तसा प्रतिसाद प्रवाशांकडून एसटीला मिळत नाही. हा प्रतिसाद पूर्वीप्रमाणे एसटीला मिळावा, याकरिता एसटी महामंडळाकडून प्रवाशांना आवश्‍यक सोयी-सुविधांसाठी देण्याचा प्रयत्न सुरू आहे. यामध्ये महत्त्वाचे म्हणजे "डीप क्‍लिन' ही संकल्पना राबविण्यात येत आहे.

डिप क्‍लिन म्हणजे एसटीला शाम्पूच्या पाण्याने स्वच्छ धुण्यात येणार आहे. शांपूच्या फेसाने कोरोनासारखा विषाणूचा खात्मा होतो. त्यामुळे दिवसातून चार बसेस या डीप क्‍लिन करण्यात येणार आहेत. फिल्डवर गेलेल्या एसटीच्या वाहक चालकांची थर्मल स्कॅनिंग करण्यात येणार आहे. मुंबईसारख्या शहरामध्ये पाठवण्यात येणारे एसटीचे वाहक चालक आणि कर्मचारी यांची कोरोना टेस्ट करूनच त्यांना पुन्हा ड्युटीवर हजर केले जाणार आहे. त्यासाठी योग्य नियोजन केले जाणार आहे. बसस्थानकातील स्वच्छतेबाबत कुठल्याही प्रकारची हयगय केली जाणार नसून तशा सप्त सूचना संबंधित ठेकेदाराला दिल्या जाणार आहेत. एसटी स्थानकाचा परिसर स्वच्छ ठेवण्याबरोबरच स्वच्छतागृह, बाथरूम क्‍लिन ठेवण्यात येणार आहे.'' 

ते पुढे म्हणाले, ""आजच्या परिस्थितीमध्ये एसटीला आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. कोरोनापूर्वी राज्यातील एसटीचे एका दिवसाचे उत्पन्न हे 22 कोटी रुपये एवढे होते; मात्र आजच्या स्थितीला दिवसाला 10 कोटी रुपये उत्पन्न मिळत आहे. जवळपास 80 टक्के एसटी सेवा सुरू केली गेली आहे.

यापूर्वी शैक्षणिक सहल, लग्न समारंभ व इतर सुविधा यातून एसटीला मोठा फायदा होत होता; मात्र या सर्व यंत्रणा बंद असल्याने एसटीचे नुकसान होत आहे. काही कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत तक्रारी आहेत; मात्र यामध्ये तांत्रिक अडचणी असल्याचे समोर आले आहे. या तांत्रिक अडचणी दूर करण्यात येणार आहेत; मात्र एसटी एकाही कर्मचाऱ्याचे पैसे बुडविणार नाही.

आपल्या कोकण दौऱ्यात सावंतवाडी एसटी स्थानक हे उत्पन्नाच्या बाबतीत कोकणात एक नंबर असल्याचे समोर आले आहे. काही त्रुटी आणि समस्याही या ठिकाणी आपल्याला दिसून आल्या असून त्या सुधारण्याच्या सूचना मी आगार व्यवस्थापकांना दिले आहेत. कोकणातील संपूर्ण दौऱ्यामध्ये अनेक समस्या मी जाणून घेतल्या असून त्या सोडवण्याच्या दृष्टीने आपण वरिष्ठांशी चर्चा करणार आहे.'' यावेळी चंद्रकांत कासार यांनी प्रवाशांच्या समस्या तसेच एसटीचे भारमान, कर्मचाऱ्यांच्या समस्या, मिनी बस, आदी विविध समस्या व त्यांचे लक्ष वेधले. 

स्थानकाचे काम वर्षभरात मार्गी 
तब्बल 8 कोटी रुपये खर्च करून उभारण्यात येणाऱ्या येथील एसटी स्थानकाच्या नवीन इमारतीचे काम गेले तीन वर्ष सुरु आहे. अद्यापही 25 टक्के काम पूर्ण झाले नाही, याबाबत त्यांना विचारले असता, काही तांत्रिक अडचणीमुळे कामात व्यत्यय आला होता; मात्र येत्या वर्षभरात हे काम मार्गी लागणार आहे. 
 

 
 

loading image