आता लोकाभिमुख कारभाराची गरज; केंद्रीय मंत्री नारायण राणे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आता लोकाभिमुख कारभाराची गरज; केंद्रीय मंत्री नारायण राणे

आता लोकाभिमुख कारभाराची गरज; केंद्रीय मंत्री नारायण राणे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कणकवली : इमारत आणि फर्निचर कितीही चांगले असले तरी या देखण्या इमारतीतून सातत्याने लोकाभिमुख कारभार करून तालुक्यातील जनतेच्या मनात चांगले काम निर्माण करा, असे प्रतिपादन केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी आज येथे केले. येथील पंचायत समितीच्या नूतन इमारतीचे काम तब्बल सात वर्षांनंतर पूर्ण झाले. त्याचे उद्‍घाटन आज झाले. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी भाजपचे आमदार नीतेश राणे, भाजप सरचिटणीस माजी खासदार नीलेश राणे, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत, सभापती मनोज रावराणे, जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती महिंद्र चव्हाण, समाजकल्याण सभापती अंकुश जाधव आदी उपस्थित होते.

यावेळी राणे म्हणाले, ‘कणकवली तालुक्यामध्ये विकास प्रक्रिया राबविण्यासाठी पंचायत समिती स्तरावर अभ्यासपूर्ण कामाची गरज आहे. यासाठी या नव्या इमारतीमध्ये वाचनालय सुरू करून सरकारच्या योजना कशा आहेत? आणि त्या कशा राबवता येतील? हे शिकण्याची गरज आहे. तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी सत्तेचे विकेंद्रीकरण केले. त्यामुळे पंचायत समिती आणि जिल्हा परिषदा अस्तित्वात आल्या. म्हणूनच तुम्ही या पदापर्यंत पोहोचू शकलात. राज्याच्या कारभारामध्ये माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी या पंचायत समिती स्तरावर सरपंचपदापासून आपली कारकीर्द सुरू केली. तशी कारकीर्द तालुक्याच्या एकाने तरी करून मुख्यमंत्रिपदापर्यंत पोहोचावे, अशी माझी अपेक्षा आहे. या सत्तेच्या विकेंद्रीकरणाचा खरा फायदा हा जनतेला होत असतो. आपण जनतेचे सेवक आहोत या भावनेतून चांगल्या योजना निर्माण केल्या पाहिजेत.’’

आमदार श्री. राणे म्हणाले, ‘‘पंचायत समिती सदस्यांना केवळ ५० हजार रुपये विकास निधी मिळतो. तो फार अपूर्ण आहे. मी याबाबत अनेकदा अधिवेशनामध्ये आवाज उठवला; मात्र सरकारने त्याला सहकार्य केले नाही; मात्र पुढच्या काळामध्ये पंचायत समितीच्या सदस्यांनाही चांगला निधी मिळावा, या दृष्टीने प्रयत्न राहतील. सरपंचाच्या हातात जितकी सत्तेची आणि निधीची ताकद आहे ती ताकद पंचायत समितीच्या सदस्यांमध्ये नाही. तरीही कणकवली पंचायत समितीने वेगवेगळे उपक्रम राबवून या तालुक्याच्या वेगळ्या विकासाचा पॅटर्न तयार केला आहे. कोरोना कालावधीतही शिक्षणाबाबत घरपोच शिक्षण हा उपक्रम राबविण्यात आला. तोही स्तुत्य होता. अशाच पद्धतीने जनतेच्या विकासाचे लोकाभिमुख काम करा."

माजी खासदार राणे यांनी कणकवली पंचायत समितीच्या वेगवेगळ्या उपक्रमाचे कौतुक केले. पंचायत समितीने गावठी आठवडा बाजार येथे सुरू केला. हा पॅटर्न संपूर्ण राज्यभर गेला. तसेच अनेक उपक्रम कणकवली पंचायत समितीच्या माध्यमातून सुरू आहेत. ते खरोखरच कौतुकास्पद आहेत, असे गौरवोद्गार काढले. यावेळी माजी आमदार राजन तेली यांनीही मनोगत व्यक्त केले. सभापती मनोज रावराणे यांनी प्रास्ताविक केले. पंचायत समितीच्या इमारतीच्या मंजुरीचा आढावा माजी सभापती संतोष कानडे यांनी घेतला. उपसभापती प्रकाश पारकर यांनी आभार मानले.

अधिकाऱ्यांविना उद्‌घाटन

पंचायत समितीच्या नूतन इमारत उद्‍घाटन कार्यक्रमाला प्रशासकीय अधिकारी मात्र उपस्थित राहिले नाहीत. केंद्रीय मंत्री प्रशासकीय कार्यक्रमाला असताना जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा गटविकास अधिकारी तरी उपस्थित राहायला हवे होते; मात्र ते आले नाहीत. पंचायत समिती स्तरावरील कर्मचारी, अधिकारी मात्र या कार्यक्रमाच्या नियोजनात सक्रिय असल्याचे दिसून आले.

loading image
go to top