रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या २० दिवसांत दुप्पट...

राजेश कळंबटे
Wednesday, 22 July 2020

. जिल्ह्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण सुमारे ६० टक्के असून मृत्यूचे प्रमाण २.७ टक्के आहे.

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादूर्भाव अजून नियंत्रणात असला तरी गेल्या २० दिवसांत जिल्ह्यातील कोरोनाबाधित रूग्णांची संख्या दुप्पट झाली असल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. जिल्ह्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण सुमारे ६० टक्के असून मृत्यूचे प्रमाण २.७ टक्के आहे.

जिल्ह्यात १ जुलै ते २१ जुलै या तीन आठवड्यांच्या काळात झालेल्या करोनाच्या वाढत्या प्रादूर्भावाबाबत जिल्हा माहिती कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार  १ जुलै रोजी जिल्ह्यात करोनाबाधित रूग्णांची संख्या ६१४ होती. मंगळवारी २१ जुलैपर्यंत ही संख्या दुपटीहूनही थोडी जास्त, १३०९ झाली आहे. १ जुलै रोजी जिल्ह्यातील ४४९ रूग्ण बरे झाले होते. हा आकडा २१ जुलैपर्यंत ७६८ झाला आहे. म्हणजे, ३१९ रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तीन आठवड्यांच्या कालावधीतील दाखल रूग्णांच्या तुलनेत हे प्रमाण सुमारे ५० टक्के आहे. 

हेही वाचा- खरे आकडे लपावणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी केंद्राकडे मागितली हजारो कोटींची मदत : निलेश राणे यांनी समोर आणली वस्तुस्थिती -

कोरोनाच्या संसर्गामुळे जिल्ह्यात १ जुलैपर्यंत २६ रूग्णांचा मृत्यू ओढवला. गेल्या तीन आठवड्यात जिल्ह्यात आणखी १६ जणांचा या महामारीमुळे बळी गेल्यामुळे हा आकडा ४२ वर पोचला आहे.राज्यातील इतर जिल्हे किंवा परप्रांतातून १ जुलैपर्यंत जिल्ह्यात आलेल्या नागरिकांची संख्या १ लाख ६३ हजार ५४३ होती. २१ जुलैपर्यंत हा आकडा सुमारे ३१ हजारांनी वाढून १ लाख ९४ हजार ६३७ झाला आहे. म्हणजेच, जिल्ह्यात दररोज सुमारे १ हजार जणांची भर पडत आहे. 

हेही वाचा- कोकणातील ग्रामपंचायतीचे चाकरमान्यांसाठी  नियम : मुंबईकर चाकरमान्यांपर्यंत धाडले निरोप... -

आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हे प्रमाण आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे चाचण्यांचे प्रमाण वाढून कोरोनाबाधितांचाही आकडा वाढण्याची शक्यता आहे. तसे झाले तरी त्यापैकी बहुसंख्यजणांची लक्षणे सौम्य असतील, असा अंदाज आरोग्य विभागाने व्यक्त केला आहे. सध्या उपचार घेत असलेल्या ४९९ रूग्णांपैकी फक्त २९ जणांना कृत्रिम प्राणवायू द्यावा लागला असून जास्त गंभीर असलेल्या एकाच रूग्णाला व्हेन्टिलेटरची गरज लागली आहे.

हेही वाचा- भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण : नियमांत राहून जपणार नामसप्ताहाची परंपरा... -

त्या दृष्टीने वैद्यकीय सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत. याचबरोबर, रूग्णांच्या चाचणी अहवालाचा पाठपुरावा करून जिल्ह्यातील संबंधित रूग्णालयांकडे हे अहवाल वेगाने पोचावेत आणि पुढील कार्यवाही सुकर व्हावी यासाठी जिल्हा पातळीवर खास समन्वयकअधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: number of corona patients disease in Ratnagiri district has doubled in 20 days