रत्नागिरीत अधिपरिचारिका 4 ऑगस्टला करणार काम बंद आंदोलन

मकरंद पटवर्धन
Friday, 31 July 2020

 यासंदर्भातील निवेदन संघटनेने आज जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्याकडे दिले. 

रत्नागिरी - जिल्ह्याच्या लोकसंख्येनुसार प्रतिदिनी 559 रुग्ण आढळून येऊ शकतात, असा अंदाज आहे. त्यानुसार नियोजन आवश्यक आहे. 476 अधिचारिका पदांऐवजी फक्त 118 कार्यरत असून उर्वरित रिक्त आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कामाचा प्रचंड ताण आहेच. पुढील 15 दिवसात पदभरती न झाल्यास फक्त 102 अधिपरिचारिका कार्यरत असतील. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र आरोग्य सेवा परिचारिका संघटनेने येत्या 4 ऑगस्टला कामबंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

 यासंदर्भातील निवेदन संघटनेने आज जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्याकडे दिले. यात म्हटले आहे, कोरोनाबाधितांना अखंडित सेवा देत त्यांना बरे करण्यात अधिपरिचारिकांचा सिंहाचा वाटा आहे. आतापर्यंत 20 अधिपरिचारिकांना कोरोना संसर्ग झाला आहे. पदभरती झाली नाही तर रुग्णसेवेची व्यवस्था कोलमडून पडेल. सीसीसी 129, डीसीएचसी 103 व डीसीएच (सिव्हिल) 150 डीसीएच (महिला रुग्णालय) येथे 94 अधिपरिचारिकांची नियुक्ती अपेक्षित आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात 63 नियमित, 33 बंधपत्रित, 16 राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत तसेच कोविड अंतर्गत तीन महिन्याच्या कंत्राटी तत्त्वावर 6 अधिपरिचारिकांची नियुक्ती करण्यात आली. बंधपत्रित 33 पैकी 16 जणींचा करार 15 दिवसांत संपणार असल्यामुळे उपलब्ध मनुष्यबळावर अधिकचा ताण येणार आहे. 

हे पण वाचा मुंबई-गोवा महामार्गावरील कणकवली चा फ्लाओर ब्रिज कोसळला ; उडाली दाणादाण 

कोविड प्रमाणे नॉनकोविड विभागाचीही कामे असतात. अपुर्‍या संख्येमुळे या अधिपरिचारिकांच्या शारीरिक, मानसिक क्षमतेवर विपरीत परिणाम होत आहे. रुग्णांचा रोष सहन करावा लागतो. बाधित झाल्यानंतर राहत्या ठिकाणी, समाजात अपराधी असल्याची वागणूक सहन करावी लागते. लक्ष वेधण्यासाठी नाइलाजाने आंदोलन करावे लागत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. संघटनेच्या अध्यक्ष स्नेहा बने यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन प्रभारी सहाय्यक अधिसेविका प्रतिज्ञा ढोल्ये, अधिपरिचारिका श्रीमती मुळ्ये, श्रीमती दुधवडकर, अधिपरिचारक प्रभाकर मुळेकर, सीताराम पालकर, अरुण डांगे यांनी दिले. हे निवेदन मुख्यमंत्र्यांसह आरोग्यमंत्री, पालकमंत्र्यांनाही पाठवले आहे.

खाटांची संख्या

कोविड केअर सेंटर (सीसीसी) 778

जिल्हा कोविड आरोग्य केंद्र (डीसीएचसी) 415

जिल्हा कोविड रुग्णालय (डीसीएच) 470 रुग्ण

महिला रुग्णालय 200 खाटा (प्रस्तावित)

  

संपादन - धनाजी सुर्वे  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nurses will hold strike on August 4 In Ratnagiri