Chiplun : नेहरूंबद्दल आक्षेपार्ह पोस्ट; काँग्रेस आक्रमक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime

नेहरूंबद्दल आक्षेपार्ह पोस्ट; काँग्रेस आक्रमक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

चिपळूण : देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस देशभर बालदिन म्हणून साजरा होत असताना सुनील बक्षी या व्यक्तीने नेहरूंबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट केली. त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला तातडीने अटक करावी, अशी मागणी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पोलिसांकडे निवेदनाद्वारे केली.

पोलिसांनी संबंधित व्यक्तीचा शोध घेऊन कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. काँग्रेसतर्फे यादव यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस १४ नोव्हेंबरला देशभर बालदिन म्हणून साजरा करण्यात आला. देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले उभे आयुष्य देणाऱ्या नेत्यांपैकीच पंडित नेहरू एक होते. आबालवृद्धांपासून सर्वांनाच त्यांचा अभिमान आहे; मात्र सुनील बक्षी या व्यक्तीने पंडित नेहरूंबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह लिखाण करून ते सार्वजनिक केले आहे. त्यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या असून, जिल्हाभरातून प्रचंड संताप उफाळत आहे.

सुनील बक्षीवर तातडीने कडक कारवाई करावी. यापुढे अशा महान व्यक्तींबद्दल आक्षेपार्ह लिखाण करण्याचे धाडस कोणी करणार नाही. आपल्याकडून तातडीने कारवाई न झाल्यास चिपळूण तालुका काँग्रेसतर्फे तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा दिला आहे. या तक्रारीसोबत सुनील बक्षी याने केलेली पोस्ट, लिंक आणि त्याच्या फेसबुक अकाऊंटची माहितीही काँग्रेसतर्फे पोलिसांना देण्यात आली. या वेळी नगरसेवक करामत मिठागरी, शहराध्यक्ष लियाकत शाह, वासुदेव मेस्त्री, सदस्य गुलजार कुरवले, इम्तियाज कडू, रूपेश आवले आदी उपस्थित होते.

loading image
go to top