esakal | रत्नागिरीत या ठिकाणी आहे एक महत्वाचा किल्ला ; तुम्हांला माहित आहे का ?
sakal

बोलून बातमी शोधा

old fort in ratnagiri mandangad and describe its nature beauty

पावसाळ्यात अनेकांचे मंडणगड किल्ला विकेंड पर्यटनस्थळ झाले आहे

रत्नागिरीत या ठिकाणी आहे एक महत्वाचा किल्ला ; तुम्हांला माहित आहे का ?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मंडणगड (रत्नागिरी) : मंडणगड शहरातून समोरच दिसणाऱ्या आणि वर्षा ऋतूत बहरलेला मंडणगड किल्ल्यावरील निसर्ग मनाला भुरळ घालत आहे. पाण्याने तुडुंब भरलेले तलाव, विहिरी, हिरवळीने नवा साज परिधान केलेला परिसर, अंगाला झोंबणारा गार वारा, हे सर्व किल्ल्यावर अनुभवायला मिळत असून स्थानिकांचे ते विकेंड ठिकाण झाले आहे. पहाटे पसरलेल्या धुक्‍याने आकाशातील ढग जमिनीवर आल्याचा भास होत असून धुक्‍यातून चालण्याचा आनंद लुटण्यासाठी शहरासह तालुक्‍यातील नागरिक आवर्जून किल्ल्यावर भटकंती करत आहेत. 

मंडणगड किल्ल्यावर जाण्यासाठी काही वर्षापूर्वी डांबरी रस्ता बनवून गाडी मार्ग तयार करण्यात आला. त्यामुळे वयोवृद्ध नागरिक, पर्यटकांना किल्ल्यावर जाणे सोपे झाले. पावसाळ्यात अनेकांचे मंडणगड किल्ला विकेंड पर्यटनस्थळ झाले आहे. किल्ल्याने हिरवाईचा शालू परिधान केला आहे. तलाव तुडुंब भरले आहेत. किल्ल्याकडे शासन, प्रशासन व पुरातत्त्व विभागाने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने किल्ल्याच्या माध्यमातून पर्यटन विकासाची गाडी केवळ चर्चेच्या गुऱ्हाळात अडकली आहे. 

हेही वाचा - एनडीए परीक्षार्थींसाठी कोकणातून धावणार रेल्वेच्या तीन विशेष गाड्या 

किल्ल्यावर दोन तळी, एक मंदिर, नामशेष तटबंदी व एक तोफ आहे. कोकणातील अन्य किल्ल्यांप्रमाणेच मंडणगड किल्लाही राज्यशासनाने संरक्षित करणे गरजेचे आहे. केवळ ऐतिहासिक वारसा पुरेसा नसून पर्यटकांनी किल्ल्यास वारंवार येण्यास प्रवृत्त करणारे उपक्रम राबविणे यात संग्रहालय, उद्यान, तळ्यात बोटींगसारख्या उपक्रमांचा समावेश करण्याची मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे. 

पावसाळी पर्यटनासाठी उत्कृष्ट ठिकाण 

मंडणगड किल्ला पावसाळी पर्यटनासाठी एक उत्कृष्ट ठिकाण आहे. निसर्गरम्य परिसर, शिवकालीन तलाव, भोवतालचा नयनरम्य प्रदेश, इतिहासाच्या खुणा दाखविणारी स्थळे पाहण्यासारखी आहेत. निसर्गाशी साधर्म्य दाखवणारे उपक्रम राबवून किल्ल्यावरील वैभव पर्यटकांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे. 

हेही वाचा - ..म्हणून आम्ही पिल्ले विकून टाकली, आता तुम्हांला जातीची पिल्ले मिळणे कठीणचं ! 

सर्वात प्राचीन किल्ला..

मंडणगड एसटी स्थानकापासून मंडणगड किल्ला 4 ते 5 किमी. अंतरावर वसला आहे. रत्नागिरीतील सर्वात प्राचीन किल्ला म्हणून या किल्ल्याचा उल्लेख केला जातो. किल्ल्यावर वरपर्यंत वाहन जाण्यासाठी उत्तम डांबरी रस्ता आहे. या किल्ल्याची उभारणी 12 व्या शतकात पन्हाळ्याचा राजा भोज याच्या कारकिर्दीत झाली असावी.

किल्ल्याची पडझड झाली असली तरी आजही त्याचे काही अवशेष गडावर पाहायला मिळतात. मंडणगड किल्ल्यावर दोन सुंदर तलाव असून त्यांच्याभोवती कुलपाच्या आकाराचे वैशिष्ट्यपूर्ण दगड आहेत. तिथे असलेली कबर ही छत्रपती शिवाजी महाराजांचा एकनिष्ठ सेनानी दर्यावर्दी दौलतखान याची असावी, असे म्हणतात. डोंगराच्या माथ्यावर वसलेला हा किल्ला गिरीदुर्ग या प्रकारांत मोडणारा आहे. या किल्ल्याची तटबंदी 8 एकर क्षेत्रात पसरली असून इथून दिसणाऱ्या परिसराचे दृश्‍य अत्यंत मनोहारी असते.  

संपादन - स्नेहल कदम 

loading image