Old Tradition Of Mandap In House Only In Memories Sindhudurg Marathi News
Old Tradition Of Mandap In House Only In Memories Sindhudurg Marathi News

"खळ्या'तील ते मंडपाचे दिवस उरले आठवणीत 

नांदगाव ( सिंधुदुर्ग ) - गेल्या काही वर्षांत नळ्याची घरे दिसेनासी झाली. त्यांची जागा स्लब व सिमेंट पत्र्यांनी घेतली आहे. अशातच अंगणातील शोभा वाढविणारे उन्हाळ्यात घराला गारवा देणारे गवताचे मंडपही सध्या दुर्मिळ होऊन त्याठिकाणी पत्र्यांच्या मंडपांनी कब्जा केला आणि गावपण कमीच झाले. शिवाय उन्हाळ्यातले मुलांचे दिवसाचे खेळ आणि गवताच्या मंडपावर रात्रीच्या झोपेची मज्जाही निघून गेली; मात्र या आठवणी विसरता येत नाहीत. 

मार्चमध्ये जिल्ह्यात अनेकांच्या अंगणात सर्रास मंडप घालण्याची कामे सुरू व्हायची. यासाठी वर्षभर सुरक्षित ठेवलेले बांबू, मेडी आणि यासाठी लागणारे वेगळे गवत आमच्याकडे याला "तांबेट' असे म्हटले जाते. ही तांबेट ठराविक ठिकाणीच येत असल्याने कापण्यासाठी महिलांची चढाओढ असायची; मात्र गावच्या मंदिरातील कौल मिळाल्यावरच ही कापणी व्हायची तर मंडप घालण्यासाठी वाडीतील युवावर्ग मदतीला यायचा. मंडप उभा व्हायचा आणि घराची शोभा अधिकच वाढायची. शिवाय पुढच्या पडवीत गारवा जाणवायचा. 

नंतर अंगणात म्हणजेच आमच्या खळ्यात शेणाने सारवून माता भगिनी सुंदर चुन्याने करणे काढायची. तेव्हा हे खळे नवऱ्या-नवरी सारखे दिसायचे. गवतात घावमारीच्या छोट्या छोट्या बांधल्या खुपसून आणि काहीजण मेडींना रंग काढून यांचे सौंदर्य अधिकच खुलवायचे. आणि हेच खळे मुलांच्या परिक्षा संपायची आणि मुंबईच्या चिल्यापिल्यांची वाट पहायचे. आणि एकदा का परिक्षा संपली की खरी मज्जा, मस्ती आणि धम्माल याच खळ्यात रंगायची. ती अगदी जूनपर्यंत म्हणजेच पुन्हा शाळा सुरू होईपर्यंत. तोपर्यंत हे खळे शांत झोपायचेही नाही. त्या आठवणी आल्यावर आजही मन त्या जमान्यात घेऊन जाते. 

सकाळी याच खळ्यात महिला कच्चा फणस फोडायची. घरातील सर्वज, गरे, गोट्या काढायला मदत करायचे. याचवेळी आजी, आजोबा व जेष्ठ मुंबईहून आपल्या मुलांचे लहानपणीचे विविध किस्से सांगायचे. काही वेळात भाजी तयार व्हायची आणि केळीच्या किंवा कुंभयाच्या पानातून प्रत्येकाला दिली जायची आणि खळ्याच्या ओसरीवर बसून गप्पा मारत फस्त व्हायची. हाच त्यावेळचा नाश्‍ता असायचा; पण पत्र्याच्या मंडपाने तेही हिरावून घेतले. 

दुपार कधी व्हायची याची वाट बघणारे बच्चे कंपनी जेवल्या-जेवल्या खळ्यात हजर आणि तळ्यात-मळ्यात, डोंगर की पाणी आणि खांबांच्या खेळाला सुरुवात व्हायची. मोठ्यांची झोप उडायची. ओरडा पडायचा. काही वेळ हळू आवाजात खेळ पुन्हा सुरूच तर युवावर्ग याच खळ्यात एक कोपरा पकडून परतते कुटायचे. दमल्यावर याच खळ्यात हे बाळ गोपाळ थोडीशी झोपही घ्यायचे. संध्याकाळ कधी व्हायची ते कळायचेही नाही. 
संध्याकाळी खळ्यात झाडलोट व्हायची. घासलेटचे टेंबे लागायचे आणि याच प्रकाशात भेंड्या सुरू व्हायच्या रंगायच्याही आणि जेवून झाल्यावर दिवसभर थकलेल्या आमच्या माता भगिनी लंगडी एक डावही मस्त खेळायचे. तेव्हा दिवसभराचा थकवा हवेत विरून जायचा, कित्येक हळदी, लग्नाचे साक्षीदार असलेले हे खळे हळूहळू इतिहास जमा होत आहे. असे असले तरी आठवणी अनेक वर्षे विसरू शकत नाही. 

रात्री याच खळ्यातून शेजारी एकमेकांना जेवून झाले काय? असे आपुलकीने विचारपूस करायला विसरायचे नाहीत. तोपर्यंत हे खळे झोपायचे नाही किंवा विश्रांती घ्यायचे नाही. रात्रीचे दिवे वीझायचे आणि पुरुष मंडळी खळ्याच्या छतावर बिनपंख्याची झोप घेण्यास जायचे तर वयस्कर पुरुष लहानांना कुशीत घेऊन खळ्यात झोपी जायचे. आणि थकलेले खळेही काहीवेळ विश्रांती घ्यायचे; मात्र आता हे चित्र दिसणे दुर्मिळ झाले आहे आणि दिसल्यावर जुन्या आठवणी जाग्या झाल्याशिवाय राहत नाहीत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com