esakal | कासव पिल्लांचा `येथे` जन्मसोहळा 

बोलून बातमी शोधा

Olive Ridley Sea Turtle Festival In Kelashi Ratnagiri Marathi News

दापोली तालुक्‍यातील समुद्र किनाऱ्यावरील 7 गावातील 36 घरट्यात आतापर्यंत वनविभागाने कासव मित्रांच्या सहकार्याने 3 हजार 852 कासवांची अंडी संरक्षित केली आहेत.

कासव पिल्लांचा `येथे` जन्मसोहळा 
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

दाभोळ ( रत्नागिरी ) - दापोली वनविभाग व कासव मित्रांच्या सहकार्याने दापोली तालुक्‍यातील 7 गावातील समुद्र किनाऱ्यावर 36 घरट्यात कासवाची 3 हजार 852 अंडी संरक्षित केली आहेत. केळशी येथील समुद्र किनाऱ्यावरील संरक्षित घरट्यामधून कासवाची बाहेर आलेली 40 पिल्ले समुद्रात सोडण्यात आली असून मुरूड येथूनही 2 कासवांच्या पिल्लांना समुद्रात सोडण्यात आले. 

दापोली तालुक्‍यातील समुद्र किनाऱ्यावरील 7 गावातील 36 घरट्यात आतापर्यंत वनविभागाने कासव मित्रांच्या सहकार्याने 3 हजार 852 कासवांची अंडी संरक्षित केली आहेत. यामध्ये मुरूड येथे 8 घरट्यांमध्ये 872 अंडी, केळशी येथे 4 घरट्यांमध्ये 447, कोळथरे येथे 6 घरट्यांमध्ये 468, आंजर्ले येथे 6 घरट्यात 769, कर्दे येथे 3 घरट्यात 315, दाभोळ येथे 7 घरट्यात 764 तर लाडघर येथे 2 घरट्यात 217 कासवांची अंडी संरक्षित केली आहेत. 

दाभोळपासून केळशीपर्यंतच्या निसर्गरम्य आणि शांत समुद्रकिनाऱ्यावर ऑलिव्ह रिडले जातीची कासवे अंडी घालण्यासाठी येतात. त्यांनी घातलेल्या या अंड्यांचे संरक्षण व्हावे यासाठी दापोली वनविभागाकडून कासवमित्रांच्या सहकार्याने ही अंडी घरट्यांमध्ये संरक्षित केली जातात. या वर्षीच्या मोसमात 3 हजार 852 एवढ्या मोठ्या प्रमाणात कासवाच्या अंड्यांचे संरक्षण करण्यात आले आहे. 21 डिसेंबरपासून ही मोहीम हाती घेण्यात आली असून संरक्षित केलेल्या कासवाच्या अंड्यातून कासवांची पिल्ले बाहेर येण्यास सुरवात झाली आहे. ही पिल्ले समुद्रात सोडण्यास सुरवात झाली. 15 एप्रिलपर्यंत संरक्षित केलेल्या घरट्यांमधून ही सर्व पिल्ले टप्प्याटप्प्याने समुद्राकडे झेपावतील. 

आंजर्ले येथे कासव महोत्सव 

आंजर्ले समुद्रकिनारी 7 घरट्यात 769 कासवांची अंडी संरक्षित करण्यात आली असून 14 मार्च ते 31 मार्च या कालावधीत आंजर्ले येथे कासव महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवासाठी येणाऱ्या पर्यटकांना डॉल्फीन राईड, सुवर्णदुर्ग किल्ला दर्शन, आंजर्ले खाडीत बॅकवॉटर सफर आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती तृषांत भाटकर व अभिनय केळसकर यांनी दिली आहे.