नशीब देतं आणि कर्म नेतं : ‌ कोटीचा ‘घोळ’ जाळ्यातून निसटला!

सकाळ वृत्तसेवा
Friday, 9 October 2020

मच्छीमाराला हुरहूर; रत्नागिरीत चर्चेला सुरवात, ६५ हजार रुपयेच हाती

रत्नागिरी :  वादळामुळे विस्कळित झालेल्या मच्छीमारांच्या जाळ्याला मासळी सापडू लागली आहे. गुरुवारी (ता. ८) रत्नागिरीतील एका नौकेला बंपर मासा सापडला असून, एका नौकेला घोळ माशांची लॉटरी हुकली. एक कोटीचा ‘घोळ’ मासा जाळं फाटल्यामुळे पाण्यात निघून गेला आणि मच्छीमारांना हुरहूर लागली. अवघा ४० किलो मासा जाळ्यात शिल्लक राहिला. त्याचे फक्‍त ६५ हजारच हाती लागले.

वादळ गेल्यानंतर ठप्प झालेल्या मासेमारीला पुन्हा सुरवात झाली आहे. शेकडो नौका सकाळी समुद्रावर स्वार होत आहेत. कुणाला लाखाची तर कुणाला हजाराची मासळी जाळ्यात मिळत आहे. सगळेच समाधानी आहेत, असे नाही. पर्ससिननेट, ट्रॉलिंगसह गिलनेटवाल्यांमध्ये दिवसागणिक अस्वस्थता दिसत आहे.

काहीजण मासळी मिळत नसल्याने नाराज आहेत. जयगड, गणपतीपुळेपासून खोल समुद्रात मच्छीमारांना थोडाफार दिलासा मिळतोय. रत्नागिरीतील एका मच्छीमारी नौकेला गुरुवार पावला होता. खोल समुद्रात मासेमारी करताना सोनेरी मासा अशी ओळख असलेला ‘घोळ’ मासा जाळ्यात सापडला. बंपर मासळी पाहिल्यानंतर नौकेवरील सर्वांच्याच भुवया उंचावल्या. खलाशी जाळी ओढण्यात गुंतले होते. सुमारे तीन लोड ‘घोळ’ जाळ्यात होता. कोटीतली मासळी पाहून नौकेवरील सर्वजणं हर्षोल्हासित झाले होते.

हेही वाचा- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिलेच्या खून प्रकरणी पाचवा संशयित ताब्यात -

मात्र, तो आंनद काही क्षणाचाच ठरला. अचानक जाळं फाटलं आणि जथ्थ्यानं सापडलेला घोळ क्षणार्धात समुद्राच्या पाण्यात गायब झाला. अवघा ४० किलो घोळ जाळ्यात शिल्लक होता. १ हजार ६५० रुपये किलोने हा मासा विकला गेला. त्याचे अवघे ६५ हजार रुपयेच हाती आल्याची चर्चा सुरू आहे. नशीब देतं आणि कर्म नेतं, अशीच काहीशी अवस्था त्या मच्छीमारावर आली. घोळ माशाच्या पोटातील पिशवी ही औषधासाठी वापरण्यात येते. त्यामुळे त्याला सोनेरी मासळी म्हणूनच ओळखतात. या वातावरणात रत्नागिरीतील विशिष्ट किनारी भागात हा मासा सापडतो.

त्या नौकेला लाखमोलाची मासळी
रत्नागिरी शहरातील दुसऱ्या एका नौकेला जयगड दरम्यान चाळीस वावात दोडी, बांगडा, ढोमा अशी लाखमोलाची मासळी मिळाल्याची चर्चा सुरू असून सोशल मीडियावरही व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्या मासळीची किंमत लाखो रुपयांची असल्याची चर्चा सुरू आहे. 

दृष्टिक्षेपात..
  घोळच्या पोटातील पिशवीचा औषधासाठी वापर
  सोनेरी मासळी म्हणूनच ओळखतात
  रत्नागिरीतील विशिष्ट किनारी भागात आढळ 
  घोळला मिळाला १ हजार ६५० रुपये किलो दर!

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One crore muddy fish went out into the water due to a torn net