जगबुडी नदीवरील ब्रिटीशकालीन पुलावरून एकेरी वाहतूक

सिद्धेश परशेट्ये
रविवार, 7 जुलै 2019

  • खेड तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस
  • जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने सुरक्षिततेचा उपाय म्हणून नदीवरील ब्रिटीशकालीन पुलावरील वाहतुक मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास बंद
  • पहाटेच्या पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास एकेरी वाहतुक सुरू
  • मध्यरात्रीपासून पुलाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा 

खेड - तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली. सुरक्षिततेचा उपाय म्हणून मुंबई - गोवा महामार्गावरील जगबुडी नदीवरील ब्रिटीशकालीन पुलावरील वाहतुक मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास बंद करण्यात आली. आज पहाटेच्या पावसाने थोडी उसत दिल्यानंतर पाण्याची पातळी कमी झाली. सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास पुलावरून एकेरी वाहतुक सुरू करण्यात आली. दरम्यान मध्यरात्रीपासून पुलाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसून आल्या.

दोन दिवसांपासून पावसाने जोर धरला आहे. यामुळे जगबुडी व नारंगी या दोन प्रमुख नद्याच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. सुरक्षिततेचा उपाय म्हणून प्रशासनाने भरणे येथील जगबुडी नदीच्या पुलावरील वाहतुक बंद केली. पावसाचा जोर कायम असल्यामुळे जगबुडी नदीच्या पाण्याने पुलाची उंची गाठली आहे. काही छोट्या वाहनांनी खेड शहरातून रेल्वे स्थानक मार्गे आपली वाहने मार्गस्थ केली. परंतु मोठ्या वाहनांच्या लांबच्या लांब रांगा दहा - बारा किलोमीटर पर्यंत दिसून येत होत्या. त्यामुळे प्रवासी वर्गांचे खुप हाल झाले.

जगबुडी नदीने धोक्याची पाणी पातळी ओलांडल्यानंतर काहीही होवू शकते. त्यामुळे दक्षता म्हणून या पुलावरची वाहतुक बंद करण्यात आली होती. जगबुडी नदीने काल मध्यरात्री सात मिटरची पाणी पातळी ओलांडली होती. पाण्याचा प्रवाहाचा वेग खुपच जास्त होता. त्यामुळे खबरदारी म्हणून वाहतुक बंद ठेवण्यात आली होती.

राष्ट्रीय महामार्गांच्या अधिकार्‍यांनी देखील या ठिकाणी पहाणी केली आहे. ही पाणी पातळी आज सकाळी कमी झाल्यामुळे या पुलावरील वाहतुक संथ गतीने सुरू केली आहे. पुन्हा पाणी पातळीत वाढ झाल्यास या पुलावरील वाहतुक पुन्हा बंद करण्यात येईल. पुलाच्या दोन्ही बाजूला खबरदारीचा उपाय म्हणून रात्र -दिवस पोलिस बंदोबस्त ठेवला आहे.

- प्रविण पाटील, पोलिस उपविभागीय अधिकारी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: one way traffic on the British Bridge on Jagbudi River