esakal | लाॅकडाउनचा असाही इफेक्ट! ऑनलाईन स्पर्धांचा कोकणात ट्रेंड 
sakal

बोलून बातमी शोधा

Online competition trends in Konkan

शाळा सुरू होण्याबाबत अद्यापही निर्णय न झाल्याने मुलांसह पालक मोठया संख्येने ऑनलाईन स्पर्धांमध्ये सहभागी होत आहेत

लाॅकडाउनचा असाही इफेक्ट! ऑनलाईन स्पर्धांचा कोकणात ट्रेंड 

sakal_logo
By
निलेश मोरजकर

बांदा (सिंधुदुर्ग) - कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच असल्याने शाळा, महाविद्यालये सुरू होण्याबाबत अद्यापही अनिश्‍चितता कायम आहे; मात्र जिल्ह्यात या काळात ऑनलाईन स्पर्धांचा नवा ट्रेंड सेट झाला आहे. यामध्ये कविता, वक्तृत्व, नाट्यछटा, नृत्य, वेशभूषा या स्पर्धांचा समावेश आहे. या स्पर्धांना प्रतिसादही तितकाच मिळत आहे. 

शाळा सुरू होण्याबाबत अद्यापही निर्णय न झाल्याने मुलांसह पालक मोठया संख्येने ऑनलाईन स्पर्धांमध्ये सहभागी होत आहेत. यासाठी मुलांबरोबरच पालक देखील मेहनत घेत असल्याचे चित्र आहे. मार्चच्या दुसऱ्या पंधरवड्यात कोरोनाचा महाराष्ट्र राज्यात शिरकाव झाला.

स्थानिक पातळीवर कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढल्याने 20 मार्चपासून राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश शासनाकडून देण्यात आले. कोरोनाचा संसर्ग वाढल्याने यावर्षी नवीन शैक्षणिक सत्र देखील अद्यापही सुरू झाले नाही. सद्यस्थितीत व्हॉट्‌सऍप समूह व ऑनलाईन पद्धतीने शिक्षणाचे धडे विद्यार्थ्यांना देण्यात येत आहेत. लहान मुलांना असलेला धोका लक्षात घेता त्यांना घरीच राहण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. सातत्याने घरात राहून मुलांच्या मानसिकतेवर होणारा परिणाम लक्षात घेता अनेक स्वयंसेवी व सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थानी ऑनलाईन स्पर्धा सुरू घेण्याचा निर्णय घेतला. 

शैक्षणिक सत्र सुरू असताना विविध क्रांतिकारकांच्या जयंती, पुण्यतिथी, विविध दिनविशेष यांचे औचित्य साधून शाळास्तरावर किंवा तालुका, जिल्हा पातळीवर विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. यामध्ये विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व शैलीत व इतरांसमोर बोलण्याचा आत्मविश्‍वास यामध्ये वाढ होत असे. कोरोनामुळे शाळा बंद असल्याने मुले या स्पर्धांपासून लांब गेली आहेत. यासाठी विविध संस्थांनी ऑनलाईन स्पर्धा घेतल्या आहेत. यामध्ये राखी बनविणे, शालेय वक्तृत्व, गायन, कविता वाचन, क्रांतिकारकांच्या वेशभूषा, नृत्य अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या आहेत. स्पर्धा ऑनलाईन असल्याने त्याला मर्यादा नसल्याने राज्यातूनही स्पर्धक सहभागी होत आहेत. स्पर्धांचा निकाल देखील ऑनलाईन देण्यात येत आहे. विजेत्यांना देण्यात येणारे प्रशस्तीपत्र देखील ऑनलाईन पाठविण्यात येत आहे. 

महानगराच्या तुलनेत कोकणातील ग्रामीण भागात ऑनलाईन शिक्षण हे केवळ स्वप्नवत होते; मात्र कोरोना काळात ऑनलाईन शिक्षण घेण्यावाचून पर्याय नाही. यासाठी कित्येक पालक हे ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी ग्रामीण भागातून शहरात येत आहेत. 15 ऑगस्ट या स्वातंत्रदिनी देखील अनेक संस्थांनी आद्य क्रांतिकारकांच्या स्मृतिप्रीत्यर्थ अनेक स्पर्धांचे आयोजन केले होते. 

कोरोनामुळे ऑनलाईन शिक्षण प्रणाली ही ग्रामीण भागातील मुलांनाही आत्मसात करावी लागली आहे. शाळेतील वातावरण हे मुलांसाठी नेहमीच आवडीचे असते. शाळा बंद असल्याने मुलांच्या मानसिकतेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे ऑनलाईन स्पर्धांच्या माध्यमातून मुलांना व्यस्त ठेवण्यासाठी ऑनलाईन स्पर्धा हा महत्वाचा घटक ठरू शकतो. 
- दयानंद कुबल, अध्यक्ष, कोकण कला व शिक्षण विकास संस्था. 

संपादन - राहुल पाटील

loading image
go to top