आप्तेष्टांना बाप्पाचे दर्शन होण्यासाठी असाही फंडा...

तुषार सावंत
Sunday, 30 August 2020

यंदा कोरोनामुळे शहर तसेच अनेक गावात पुरोहित जाऊ शकले नाहीत; मात्र अनेक भाविकांनी विविध ऍपचा वापर करत मंत्रोच्चारात गणरायांची पूजा केली.

कणकवली (सिंधुदुर्ग) - यंदाच्या गणेशोत्सवात केवळ 40 हजार चाकरमानी सिंधुदुर्गात दाखल झाले; मात्र मुंबई व इतर भागात राहिलेले चाकरमानी विविध सोशल मीडियाचा वापर करून श्रींचे ऑनलाईन दर्शन घेत आहेत. एवढेच नव्हे तर पूजा आणि सायंकाळच्या आरतीमध्येही ऑनलाईन सहभाग घेत असल्याचे चित्र आहे. याखेरीज जिल्ह्यातील भाविकांनीही आपापल्या गणरायांचे दर्शन नातेवाईक, मित्रमंडळींना घडवून आणण्यासाठी विविध ऍपचा खुबीने वापर केला आहे. 

यंदा कोरोना संसर्गामुळे गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यामध्ये मर्यादा आल्या; मात्र त्यातही गणरायांची सेवा करण्यासाठी तरूणाईकडून डिजिटल माध्यमांचा वापर करून विविध फंडे शोधून काढले जात आहेत. यंदा कोरोनामुळे शहर तसेच अनेक गावात पुरोहित जाऊ शकले नाहीत; मात्र अनेक भाविकांनी विविध ऍपचा वापर करत मंत्रोच्चारात गणरायांची पूजा केली.

त्यानंतर सायंकाळी होणारी आरती, गौरी-गणरायांसमोर होणाऱ्या फुगड्या, घरगुती भजन या कार्यक्रमांचाही आनंद जिल्हाबाहेर असणारे चाकरमानी ऑनलाईनच्या माध्यमातून घेत आहेत. काही सार्वजनिक मंडळांनीही सायंकाळी होणारी श्रींची आरती फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून भाविकांपर्यंत पोचवली होती. 

लाडक्‍या गणरायाचे घरोघरी आगमन झाल्यानंतर वाडीतील, गावातील तसेच अन्य तालुक्‍यातील, शहरातील भाविक, लोकप्रतिनिधी घराघरातील गणरायांच्या दर्शनासाठी बाहेर पडतात. यंदा कोरोनामुळे ही परंपरा खंडित झाली; मात्र अनेक तरुणाईंनी आपापल्या घरातील गणरायाचे दर्शन ऑनलाईन घडवले. त्यासाठी फेसबुक, व्हॉट्‌सऍप, इन्स्टाग्राम आदी माध्यमांचा वापर करण्यात आला.

काही युवकांनी तर घरात आणलेला गणपती, त्यांची सजावट, पूजा विधी यांच्या छोट्या व्हिडिओ क्‍लीप कल्पकतेने तयार केल्या आहेत. त्याला गणरायांची आरती आणि इतर गीतांची जोड देऊन सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या सर्वांपर्यंत पोचवल्या जात आहेत. तरुणाईच्या या कल्पकतेलाही मोठी दाद मिळत आहे. 

गर्दी टाळण्यासाठी... 
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणेश दर्शनासाठी गर्दी होऊ नये यासाठी लाइव्ह दर्शनाची सोय उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे भाविकांना घरबसल्या सार्वजनिक गणपतींचे दर्शन घेता येत आहे. 

कॉलींगची मर्यादा वाढली 
ऑनलाईन मिटिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या सोशल मीडियातील व्हॉट्‌सऍप, डीओ, गुगल मिट आदी ऍपच्या व्हिडिओ कॉलींगमध्ये पूर्वी व्यक्‍तींच्या सहभागावर मर्यादा होती; मात्र गेल्या काही दिवसांत ही मर्यादा वाढविण्यात आली. त्याचाही मोठा फायदा भाविकांनी ऑनलाईन दर्शनासाठी करून घेतला आहे. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Online darshan of Ganpati Bappa in Konkan