गणपतीपुळ्यात देवस्थानची दर्शनासाठी गणेशोत्सवात `ही` सुविधा

राजेश कळंबटे
Friday, 21 August 2020

गावातील लोक मंदिरात जाऊन दर्शन घेतात. दर्शन घेतल्यानंतर मंदिरातील तीर्थ घरी नेऊन त्याचे पुढे पाच दिवस पूजन केले जाते. कोरोनामुळे मंदिरच बंद आहे. त्यामुळे ही प्रथा पाळता येणे शक्‍य नाही. त्यातून सुवर्णमध्य काढण्याचा प्रयत्न गणपतीपुळे मंदिर कमिटीकडून सुरू आहे.

रत्नागिरी - गणपतीपुळे आणि परिसरातील चार गावांमध्ये "एक गाव एक गणपती' ही प्रथा गेली पाचशे वर्षे आहे. या साऱ्यांचा एकच गणपती पुळ्याचा. मात्र, यंदा कोरोनामुळे गणेशभक्‍तांना दर्शनासाठी मंदिर खुले करणे अशक्‍य असल्याने ही परंपरा खंडित होणार आहे. तरीही श्री गणरायाच्या चरणाचे तीर्थ लोकांपर्यंत पोचवण्यासाठी मंदिर व्यवस्थापनाकडून प्रयत्न सुरू आहेत. 

"एक गाव एक गणपती' अशी संस्कृती 500 वर्षे सुरू आहे. मालगुंड, निवेंडी, गणपतीपुळे, नेवरे या परिसरातील ग्रामस्थ घरात गणपती आणत नाहीत. गावांमध्ये घरात नैवेद्य तयार करून तो गणपतीपुळ्याच्या देवळात नेऊन दाखवला जातो. तेथील तीर्थ घरी आणून त्याची पूजा केली जाते. यंदा त्यावर कोरोनाचे सावट आहे. 

गावातील लोक मंदिरात जाऊन दर्शन घेतात. दर्शन घेतल्यानंतर मंदिरातील तीर्थ घरी नेऊन त्याचे पुढे पाच दिवस पूजन केले जाते. कोरोनामुळे मंदिरच बंद आहे. त्यामुळे ही प्रथा पाळता येणे शक्‍य नाही. त्यातून सुवर्णमध्य काढण्याचा प्रयत्न गणपतीपुळे मंदिर कमिटीकडून सुरू आहे. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाकडे मागणी करण्यात आली आहे.

शुक्रवारी (ता. 21) सायंकाळी या विषयावर जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्याशी चर्चा झाली. प्रथा-परंपरा कायम ठेवण्यासाठी गणपती मंदिरातून पूजा केलेले तीर्थ गावातील पाच लोकांना दिले जाईल. ते पाच लोक परंपरेचे जतन करणाऱ्या लोकांना श्री गणरायाचे तीर्थ घराघरात देतील. यामुळे दर्शनाचे नाही तरी तीर्थाची पूजा करण्याचे समाधान भक्तांना लाभेल. 

मंदिरे बंद ठेवण्याचे आदेश शासनाने दिलेले आहेत. ती उघडण्याची परवानगी जिल्हाधिकारी देऊ शकत नाहीत. गणेशोत्सवाची प्रथा मोडू नये, यासाठी मंदिर प्रशासनाकडून पाच लोकांना तीर्थ देण्याची व्यवस्था करण्याबाबत चर्चा सुरू आहे. 
- डॉ. विवेक भिडे, देवस्थान सरपंच 

ऑनलाईन लाइव्ह दर्शन 
गणेश चतुर्थीला हजारो भक्‍तगण दरवर्षी दर्शनासाठी गणपतीपुळेत येतात. त्यांच्यासाठीही देवस्थानतर्फे ऑनलाईन लाइव्ह दर्शन देण्याची व्यवस्था केली आहे. www.ganpatipule.co.in ऑनलाईन या लिंकवर ही व्यवस्था करण्यात आली आहे. अतिपावसामुळे त्यात खंड पडण्याची शक्‍यता असते; परंतु वरुणराजाने कृपा केल्यास भक्‍तगणांना त्याचा लाभ घेता येईल, असे देवस्थानकडून सांगण्यात आले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Online Facility Available In Ganeshotsav For Darshan At Ganpatipule