२५ लाख तर मिळाले नाहीतच, पाच लाख मात्र गेले ; केबीसीच्‍या नावाखाली महिलेची फसवणूक

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 21 November 2020

गवळीवाडा येथील हा प्रकार असून, अज्ञातांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.  

रत्नागिरी : तुम्हाला पंचवीस लाखांची लॉटरी लागली आहे, मात्र पैसे ट्रान्स्फर करण्याचे चार्जेस, करन्सी कर्न्व्हटरचे चार्जेस, लॉटरीचा जीएसटी, सीबीआय एन्क्वॉयरी चार्जेस, असे ५ लाख २९९ भरायला लागतील, असे सांगून एका महिलेला अज्ञातांनी ऑनलाईन गंडा घातला. शहरातील गवळीवाडा येथील हा प्रकार असून, अज्ञातांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.  

हेही वाचा -  सिंधुदुर्गात बचतगट बांधणीलाही कोरोनामुळे ब्रेक
 

कैसरबानू इब्राहिम काझी (वय ४३, मनाह रेसिडेन्सी गवळीवाडा) असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे. ही घटना १२ ते १८ नोव्हेंबर या कालावधीत मनाह रेसिडेन्सी गवळीवाडा, रत्नागिरी येथे घडली. कैसरबानू त्यांच्या मोबाईलवर संशयित आकाश वर्मा, अनिलकुमार यादव, नंदकिशोर पासवान (पूर्ण नाव, पत्ता माहीत नाही) यांनी मेसेज केला. तुम्हाला केबीसीमधून २५ लाखांची लॉटरी लागली आहे. यासाठी बॅंक ऑफ इंडिया, मुंबईच्या मॅनेजरशी बोला, असाही मेसेज आला. या आमिषाला बळी पडून कैसरबानू यांनी संशयितांनी दिलेल्या नंबरला कॉल केला असता मॅनेजरने २५ लाखांची लॉटरी लागल्याचे सांगितले. 

हेही वाचा -  महामार्ग रूंदीकरणात महसूल बुडाला ः मनसे
 

त्यामुळे कैसरबानू यांची खात्री झाली. त्यानंतर संशयितांनी वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून २५ लाखांच्या लॉटरीसाठी  पैसे ट्रान्स्फर करायचे चार्जेस, करन्सीबाहेरील देशाची आहे, त्याचे कर्न्व्हटचे चार्जेस, लॉटरीचे जीएसटी चार्जेस, सीबीआय एन्क्वॉयरी चार्जेस, असे सांगून कैसरबानू यांच्याकडून बॅंक खात्यामार्फत एकूण ५ लाख २९९ भरावयास सांगितले. त्याप्रमाणे त्यांनी बॅंक खात्यामार्फत भरले, परंतु लॉटरीचे पैसे प्राप्त झाले नाहीत. 
संशयितांना फोन केला असता उडवाउडवीचे उत्तरे दिली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर कैसरबानू यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी तिघा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक जाधव करत आहेत.

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: online fraud with one women in ratnagiri police enquiry to relate incidents in ratnagiri