Chiplun : कोयनेतून केवळ ३० टक्केच वीजनिर्मिती; चिपळूणात पाणीटंचाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Koyna Dam

कोयनेतून केवळ ३० टक्केच वीजनिर्मिती; चिपळूणात पाणीटंचाई

चिपळूण : कोयना प्रकल्पातील वीजनिर्मितीचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे चिपळूण शहरासह लोटेतील कारखानदारांना पाणीटंचाईची समस्या जाणवत आहे. पाण्याअभावी कारखानदारांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. सध्या प्रकल्पातून केवळ ३० टक्के वीजनिर्मिती सुरू आहे.

कोयना प्रकल्पात वीजनिर्मिती झाल्यानंतर अवजल कालव्यामार्फत हे पाणी वाशिष्ठी नदीत सोडले जाते. चिपळूण नगरपालिका हे पाणी उचलून शहरातील नागरिकांची तहान भागवते. एमआयडीसी हे पाणी कारखानदारांना पुरवते. राज्यात विजेची मागणी असते, त्याच काळात म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी कोयना प्रकल्पातून वीजनिर्मिती केली जाते. सध्या प्रकल्पातून केवळ ३० टक्के वीजनिर्मिती सुरू आहे. वाशिष्ठी नदीचे पात्र कोरडे पडले आहे. त्यामुळे पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

वाशिष्ठीत कोयनेचे अवजल कमी झाल्याने काही ठिकाणी गोवळकोट खाडीचे पाणी पालिकेच्या जॅकवेलला येत असल्यामुळे शहराच्या काही भागाला मचूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. कारखानदारांना त्यांच्या बॉयरलरसाठी मोठ्या प्रमाणात पाणी लागते. काही कारखानदारांकडे दोन ते तीन दिवस पुरेल इतक्या क्षमतेच्या टाक्या आहेत; मात्र छोट्या कारखानदारांची पाण्याअभावी मोठी अडचण होते. त्यामुळे उद्योजक संघटनेकडून एमआयडीसीकडे पाण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. वाशिष्ठी नदीला कोयनेचे पाणी सोडावे, या मागणीसाठी एमआयडीसी तसेच पालिकेकडून पाठपुरावा सुरू आहे.

साठा उन्हाळ्यात वापरता यावा..

राज्यात कोळसा टंचाई होती, त्या काळात औष्णिक ऊर्जा प्रकल्प बंद होता. त्यामुळे कोयना प्रकल्पातून अतिरिक्त वीजनिर्मिती करण्यात आली. कोयना धरणातील पाण्याचा साठा उन्हाळ्यात वापरता यावा तसेच पाण्याचे समतोल राखता यावे, यासाठी सध्या कोयना प्रकल्पातून कमी वीजनिर्मिती सुरू आहे, अशी माहिती महाजेनकोचे मुख्य अभियंता संजय चोपडे यांनी दिली.

loading image
go to top