आठ तास चाललेल्या 'या' ऑपरेशनमुळे मोठा अनर्थ टळला आणि अकरा मच्छीमारांचा जीव वाचला....

Operation to bring Mumbai's 'Vijaya Maheshwari' ship ashore safe
Operation to bring Mumbai's 'Vijaya Maheshwari' ship ashore safe

रत्नागिरी - वेगवान वार्‍यामुळे भगवतीपासून 11 नॉटीकल मैल अंतरावर खोल समुद्रात बिघडलेल्या मुंबईतील 'विजया महेश्‍वरी' नौकेला किनार्‍यावर सुरक्षित आणण्यासाठी रात्रभर ऑपरेशन सुरु होते. सुमारे आठ तास चाललेल्या या ऑपरेशननंतर ती मच्छीमारी नौका जयगड बंदरात टगच्या साह्याने आणण्यात यश आले.

महाराष्ट्र मेरी टाईम बोर्डाचे प्रादेशिक बंदर अधिकारी कॅ. संजय त्री. उगलमुगल यांच्या मार्गदर्शनाखाली जेएसडब्ल्यू पोर्टचे प्रमुख, तटरक्षक दल आणि पोलिसांचे सागरी सुरक्षा दल आणि जिल्हाप्रशासनाने यात महत्त्वाची भुमिका बजावली.बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीवर वेगवान वारे वाहत आहेत. समुद्रही खवळलेला असल्याने मच्छीमारीत व्यत्यय येत आहे. सोमवारी (ता. 18) रात्री बारा वाजण्याच्या सुमारास पोलिसांच्या सागरी सुरक्षा दलाला एक मच्छीमारी नौका खोल समुद्रात अडकुन पडल्याची माहिती मिळाली. सहाय्यक पोलिस निरीक्षक रमेश रामभाऊ दळवी यांनी तत्काळ ही माहिती मेरीटाईम बोर्डाचे कॅ. संजय उगलमुगले यांना दुरध्वनीवरुन ही माहिती दिली. मुंबई येथील ‘विजया महेश्‍वरी’ या मच्छीमारी नौकेचे रात्रीच्या सुमारास अचानक इंजिन बंद पडले. नौकेवर तांडेलांसह अकरा खलाशी होते. त्यांनी खोल समुद्रातच नांगर टाकून मदतीसाठी प्रयत्न सुरु केले होते. चक्रीवादळामुळे समुद्रही खवळलेला होता. पाण्यात नौका हेलकावे खात होती. नांगरावर जास्तकाळ नौका उभी राहणेही धोकादायक ठरली असती. अनर्थ टाळण्यासाठी नौकेवरील तांडेल सुदेश दाभी यांच्याकडून मदतीसाठी प्रयत्न सुरु केले होते.

सागरी सुरक्षा दलाकडून संदेश मिळाल्यानंतर कॅ. उगलमुगल यांनी तत्काळ मदतीसाठी पावले उचलली. तटरक्षक दलाचे कमांडन्ट आणि जेएसडब्ल्यूचे कॅ. रविचंद्रन यांच्याशी संपर्क साधला. तटरक्षकची नौका घटनास्थळाकडे रवाना झाली. पाठोपाठ नौका ओढून आणण्यासाठी आवश्यक असलेली जेएसडब्ल्यूची टग बोट तिकडे पाठविण्यात आली. तोपर्यंत मध्यरात्र झालेली होती. वार्‍याचा वेगही वाढला होता. लाटांमुळे घटनास्थळी पोचण्यात अडथळे होते. प्रतिकुल परिस्थितीमध्ये मच्छीमारी नौकेच्या सुरक्षेसाठी सर्व यंत्रणा कार्यरत होत्या. इंजिन बंद पडल्यामुळे टग बोटीच्या साह्याने विजया महेश्‍वरी नौका मंगळवारी (ता. 19) सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास जयगड येथील महाराष्ट्र मेरी टाईमच्या जेटीला आणून सुरक्षित उभी करण्यात आली आहे. मोक्याच्या क्षणी केलेल्या ऑपरेशनमुळे मोठा अनर्थ टळला आणि अकरा मच्छीमारांना वाचवणे शक्य झाले. सध्या ती नौका आणि खलाशी जयगडे येथे सुरक्षित असल्याचे कॅ. उगलमुगले  यांनी सांगितले.

वातावरण बिघडल्यामुळे वेगवाने वारे वाहत असून समुद्र खवळलेला आहे. मासेमारीला समुद्रात जाताना मच्छीमारांनी काळजी घ्यावी. मोसमी पाऊस काही दिवसात सुरु होणार आहे. त्यापुर्वी दरवर्षी वातावरण बिघडते.

- कॅ. संजय त्रि. उगलमुगले, प्रादेशिक बंदर अधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com