रुसून घर सोडले; पण पोलिसांमुळे सुखरुप

महेश बापर्डेकर
Saturday, 5 December 2020

पोलिस महानिरीक्षक महिला व बाल अपराध प्रतिबंध विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशानुसार हरविलेल्या, पळविलेल्या, घरातून निघून गेलेल्या लहान मुलांच्या शोधासाठी 1 ते 31 डिसेंबर या कालावधीत ऑपरेशन मुस्कान मोहीम राबविण्यात येत आहे.

आचरा (सिंधुदुर्ग) - आईच्या रागाला वैतागून घर सोडून गेलेल्या चिंदर येथील मुलीला आचरा पोलिसांनी "ऑपरेशन मुस्कान' अंतर्गत गस्ती दरम्यान ताब्यात घेतले. संबंधित मुलीची ओळख पटवून बालकल्याण समिती कणकवलीसमोर हजर केले आहे. आचरा पोलिसांच्या या कर्तव्यदक्षतेमुळे मुलीची परत घरवापसी झाली आहे. 

पोलिस महानिरीक्षक महिला व बाल अपराध प्रतिबंध विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशानुसार हरविलेल्या, पळविलेल्या, घरातून निघून गेलेल्या लहान मुलांच्या शोधासाठी 1 ते 31 डिसेंबर या कालावधीत ऑपरेशन मुस्कान मोहीम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत रेल्वे स्थानक, बसस्थानक, रस्त्यावर भीक मागणारी मुले, कचरा गोळा करणारी मुले, रुग्णालये, हॉटेल्स, दुकाने आदी ठिकाणी काम करणाऱ्या मुलांना हरवलेली मुले समजून त्यांची चौकशी केली जाणार आहे. 

या अनुषंगाने आचरा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शामराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आचरा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस फौजदार सावंत, महिला हेडकॉन्स्टेबल देसाई, पोलिस नाईक अक्षय धेंडे आदी पोलिस कर्मचारी ऑपरेशन मुस्कान मोहीम अंतर्गत पेट्रोलिंग करत असताना ही मुलही दिसली होती. दरम्यान, सापडलेली मुलगी ही त्यांची असल्याची खात्री कुटुंबीयांकडून केली. सहाय्यक पोलिस निरीक्षक काळे यांनी त्यांना मार्गदर्शन करत शासन आदेशानुसार त्या मुलीला महिला हवालदार देसाई यांच्यासोबत बाल कल्याण समिती समोर हजर करण्यासाठी कणकवली येथे पाठविले होते. त्यांच्या आदेशानुसार पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. काळे यांनी सांगितले. 

आचरा बंदरावर आढळली 
काल सायंकाळी सातच्या सुमारास चिंदर कुंभारवाडी येथील कृतिका कृष्णा चिंदरकर (वय 17) ही मुलगी आचरा बंदर येथे आढळून आली. आचरा पोलिसांनी तिला विश्‍वासात घेत तिची विचारपूस केल्यावर आई घरात सतत रागावते म्हणून घरात कोणालाही न सांगता निघून आल्याचे सांगितले. पोलिसांनी तिला आचरा पोलिस ठाण्यात आणत तिचे वडील कृष्णा चिंदरकर यांच्याशी संपर्क साधला.  

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Operation Muskan Sindhudurg distric