'ऑपरेशन मुस्कान'मुळे फुलले बिहारी कुटुंबात हास्य...

'ऑपरेशन मुस्कान'मुळे फुलले बिहारी कुटुंबात हास्य...

रत्नागिरी- मानसिक परिणाम होऊन महिला व तिची दोन वर्षांची मुलगी बिहारहून रत्नागिरीत आली. मात्र सहृदय पोलिस आणि लांजा महिलाश्रम यांच्यामुळे तिच्या आयुष्याची परवड झाली नाही. महिलाश्रमाच्या सजगतेमुळे आणि संवेदनशीलतेमुळे जवळजवळ नऊ महिन्यानंतर तिची कुटुंबीयांशी लांजात भेट झाली. दरम्यानच्या काळात या महिलेवर सुमारे तीन महिने मानसोपचारतज्ज्ञाद्वारे उपचार करण्यात आले. महिलाश्रमाच्या या ऑपरेशन मुस्कानमुळे बिहारी कुटुंबाच्या चेहऱ्यांवर हास्य फुलले. 


23 ऑक्‍टोबर 2015 ला पाली येथील पोलिसांनी वेडसर अवस्थेतील महिला व तिच्यासोबत दोन वर्षांची मुलगी यांना ताब्यात घेतले. देखभालीसाठी त्यांना लांजा महिलाश्रमात ठेवले. तेथे प्रकृती सुधारल्यावर महिलेने नाव विमल दामोदर पासवान सांगितले. डिसेंबर महिन्यात ती नैराश्‍येचे झटके आल्यासारखी वागू लागली. त्यामुळे आश्रमाने तिला रत्नागिरीतील मनोरुग्णालयात उपचारासाठी नेले. तेथे 10 मार्च 2016 पर्यंत तिच्यावर उपचार झाले. दरम्यानच्या काळात बालकल्याण समितीच्या आदेशान्वये तिची मुलगी लाजवंती ऊर्फ निशा हिला तेथील संस्थेत ठेवले. मानसिकदृष्ट्या स्थिर झाल्यावर ती कोसुद, बिहार, भादेली, मुंगरे, सकपुरा, जीएनबीजाय, शेपासारीपूर अशा गावांची नावे सांगत असंबद्ध बोलायची. तेथील संपदा कांबळे या कर्मचाऱ्याने तिच्या कुटुंबीयांचा शोध सुरू केला. हे म्हणजे काळोख्या खोलीत काळे मांजर शोधण्यासारखे होते, परंतु इंटरनेटचा महिमाच वेगळा. संपदाने नेटवर ही सारे गावे शोधली. त्यातले मुंगरे सोडून बाकी गावे शेजारी शेजारी असल्याचे आढळले. त्याचे दूरध्वनी क्रमांक घेतले आणि सकपुरा तालुका असल्याचे कळल्यामुळे तेथे पोलिस ठाण्यात लांजातून फोन लावला. तो थेट एसपींपर्यंत पोचला. त्यांना महिलेची माहिती सांगितल्यावर एसपींनी सायंकाळपर्यंत तुम्हाला माहिती देतो, असे सांगितले आणि शब्द पाळलाही. 

सायंकाळपर्यंत दामोदर पासवान यांचा शोध लागला. एसपी दर्जाच्या अधिकाऱ्याने संबंधित पासवान यांना शोधून त्याच्याकडे पोस्टमनला पिटाळले. हरवलेली आई व मुलगी रत्नागिरी-लांजात असल्याचे तेथील पोस्टमनने त्यांना सांगितले. दूरध्वनी क्रमांकही दिले. लांजाचा संपर्क त्यांच्या भावाशी झाला. त्यांचे नाव मुनीलाल पासवान. ढेवसा-भडेली येथील डाकियानेही आपली कामगिरी बजावली. आज दामोदर पासवान, मुनीलाल पासवान मुंबईतील सुरेंद्र टी पासवान यांना घेऊन लांजात आले. तेथे ओळख पटल्याने साऱ्यांच्याच डोळ्यांत आनंदाश्रू आले. अशाही ऑपरेशन मुस्कानमुळे नऊ महिन्यांनंतर ताटातूट झालेल्या कुटुंबाची भेट झाली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com