कमीपटाच्या शाळा बंदला करण्यास रत्नागिरी जिल्हा परिषदेत विरोध

सकाळ वृत्तसेवा
Friday, 18 September 2020

त्यादृष्टीने अध्यक्ष रोहन बने, शिक्षण सभापती सुनील मोरेंनी शाळा बंद करण्यासाठी कोणावरही जबदरस्ती करू नये असे आदेश दिले आहेत. अध्यक्ष बने यांनी शिक्षक संघटना प्रतिनिधींच्या उपस्थितीत शुक्रवारी (ता. 18) बैठक झाली.

रत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या 0 ते 5 पटाच्या शाळा बंद करण्यास बहुतांश शाळा व्यवस्थापन समित्यांकडून विरोध दर्शविला जात आहे. त्यामुळे शाळा बंद करण्याच्या शासनाच्या निर्णयावर रत्नागिरीत सावधगिरीने अंमलबजावणी करावी लागणार आहे.

त्यादृष्टीने अध्यक्ष रोहन बने, शिक्षण सभापती सुनील मोरेंनी शाळा बंद करण्यासाठी कोणावरही जबदरस्ती करू नये असे आदेश दिले आहेत. अध्यक्ष बने यांनी शिक्षक संघटना प्रतिनिधींच्या उपस्थितीत शुक्रवारी (ता. 18) बैठक झाली. उपाध्यक्ष महेश नाटेकर, शिक्षण सभापती मोरे यांच्यासह शिक्षणाधिकारी उपस्थित होत्या. शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील 313 शाळा बंद कमी पट असल्यामुळे बंद करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रत्येक तालुक्‍यातून शाळा व्यवस्थापन समितीची मते घेण्याचे काम सुरू आहे. याचा आढावा अध्यक्ष बने यांनी घेतला.

बंद करण्यात येणाऱ्या शाळेपासून समायोजन केल्या जाणाऱ्या शाळेचे अंतर एक किमीपेक्षा अधिक असल्यामुळे पालकांकडूनच विरोध दर्शवला जात आहे. 0 ते 5 पटाच्या एकूण शाळांपैकी 70 टक्‍के व्यवस्थापन समित्यांनी शाळा बदंला विरोध केला आहे. मंडणगड तालुक्‍यात चार शाळा शुन्य पटाच्या आहेत. त्या आपसुकच बंद होतील; परंतु उर्वरित कमी पटाच्या शाळा दुर्गम भाग असल्याने बंद करण्यास पालकांनी नाकारले आहे. तीच परिस्थिती राजापूर तालुक्‍याची आहे. तिथे पाच शाळा शुन्य पटाच्या आहेत. पालकांची मानसिकता नसल्याचे तालुक्‍यातील शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांकडून जिल्हास्तरावर कळवण्यात आले आहे.

दरम्यान, शाळा बंद केल्यास सुमारे चारशे शिक्षक अतिरिक्‍त ठरणार असून त्यांचे समायोजन जवळच्या किंवा रिक्‍त पदे असलेल्या शाळांमध्ये करावे लागणार आहे. त्यांचे समायोजन जिल्हास्तरावर झाले तर कदाचित त्या शिक्षकांना तालुक्‍याच्या बाहेर जावे लागण्याची शक्‍यता आहे. शिक्षक संघटनांकडूनही शाळा बंदला सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. एकूण परिस्थितीचा विचार घेऊनच अध्यक्ष आणि शिक्षण सभापती यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.

शाळा बंद करण्यासाठी कोणावरही जबरदस्ती करू नये. ही प्रक्रिया करताना विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेतले जाईल. कोणत्याहीप्रकारे सक्‍ती केली जाणार नाही.

- रोहन बने, अध्यक्ष, जिल्हा परिषद  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Oppose To Close Less Students Schools In Ratnagiri Zilla Parishad