नाणारनंतर आता राजापुरात 'आयलॉग'चे रण

Oppose To I Log Port In Rajapur Ratnagiri Marathi News
Oppose To I Log Port In Rajapur Ratnagiri Marathi News

राजापूर ( रत्नागिरी ) - तालुक्‍यातील आंबोळगड परिसरामध्ये प्रस्तावित आयलॉग प्रकल्पाला काही स्थानिक ग्रामस्थांसह मच्छीमारांनी विरोध केल्याने राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी या प्रकल्पाला तात्पुरती स्थगिती दिली आहे; मात्र या प्रकल्पाचे स्थानिकांकडून समर्थनही केले जात आहे. प्रकल्प विरोधकांसह प्रकल्प समर्थकांचीही मोठी फळी उभी राहण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे संघर्ष पेटण्याची शक्‍यता आहे. 

नाटे ग्रामस्थांनी ग्रामसभेच्या माध्यमातून प्रकल्पाला यापूर्वीच पाठिंबा दिला आहे. प्रकल्पाच्या समर्थनार्थ नाटे परिसरामध्ये मोठ्या संख्येने संघटित होण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. तालुक्‍यातील आंबोळगड समुद्र किनाऱ्यावर आयलॉग प्रकल्प प्रस्तावित आहे. सुमारे 135 कोटी रुपयांचा 10 लाख मिलियन टन क्षमतेचा हा प्रकल्प असून त्यासाठी सुमारे 1 हजार 48 एकर जागेची आवश्‍यकता आहे. 2011 पासून आतापर्यंत सुमारे 575 एकर जागा कंपनीने घेतली आहे. या ठिकाणी असलेली पाण्याची पुरेशी खोली, रस्त्याची उपलब्धता, पडीक व विनावापर खडकाळ जमीन, विस्थापन व पुनर्वसनाची गरज नाही म्हणून या सर्वांचा विचार करून आयलॉगसाठी आंबोळगड समुद्र किनाऱ्याची निवड करण्यात आली. 

दोन वर्षांपूर्वी या प्रकल्पासाठी जनसुनावणी घेण्यात आली होती. त्यावेळी लोकांनी प्रकल्प अहवाल इंग्रजीमध्ये असण्यावर आक्षेप नोंदवित जनसुनावणी उधळून लावली होती. त्यानंतर कंपनीने नाटे पंचक्रोशीतील काही ग्रामपंचायतींना मराठी अनुवादामध्ये प्रकल्प अहवाल दिला होता; मात्र गेल्या दोन वर्षांमध्ये प्रकल्पाच्या विरोधात कोणतीही आंदोलने झालेली नाहीत. त्यानंतर चार दिवसांपूर्वी जनहक्क सेवा समितीने पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर ठाकरे यांनी तात्पुरती स्थगिती देण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या निर्णयाच्या विरोधात स्थानिक पातळीवर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

या प्रकल्पामुळे कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होणार नसून मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. असे असताना प्रकल्पाला विरोध का, असा सवाल प्रकल्प समर्थकांकडून उपस्थित केला जात आहे. नाटे ग्रामस्थांनी ग्रामसभेद्वारे यापूर्वी प्रकल्पाला संमती दिलेली आहे. असे असताना स्थानिकांशी न बोलता प्रकल्पाला स्थगिती देणे दुर्दैवी बाब असल्याचेही ग्रामस्थांनी सांगितले. प्रकल्पाच्या समर्थनार्थ संघटित होण्याच्या हालचाली नाटे परिसरामध्ये सुरू झाल्या असून त्याबाबत लवकरच बैठक होणार आहे.  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com