ग्रामपंचायतींचा विरोध, पण पंचायती समितीत या प्रकल्पाचा ठराव कसा ?

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 12 August 2020

श्री. साळसकर म्हणतात, गिर्ये, रामेश्‍वर, विजयदुर्ग गावातील नागरिकांच्या विरोधामुळे शासनाने प्रकल्प रद्द करण्यात येत असल्याची अधिसूचना जाहीर केली. त्यामुळे स्थानिकांची सुटकेचा निश्‍वास टाकला.

देवगड ( सिंधुदुर्ग) - यापुर्वी विरोध करणारी मंडळी नाणार रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन करत आहेत. रोजगाराचे तरूणांना आमिष दाखवून स्थानिकांच्या डोळ्यात धूळफेक करीत आहेत. तरीही गिर्ये, रामेश्‍वर, विजयदुर्ग परिसरातील नागरिकांचा यापुढेही प्रकल्पाला विरोध राहणार असल्याचे शिवसेना जिल्हा उपप्रमुख विलास साळसकर यांचे म्हणणे आहे. खाडीकिनारच्या गावातील ग्रामपंचायतींचा प्रकल्प विरोधी ठराव असताना पंचायत समितीने पाठींब्याचा ठराव घेतलेली गावे कोणती? असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला. 

रिफायनरी प्रकल्पावरून समर्थन आणि विरोधाचा पुन्हा जोर होण्याची शक्‍यता आहे. प्रकल्पाबाबत दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात श्री. साळसकर म्हणतात, गिर्ये, रामेश्‍वर, विजयदुर्ग गावातील नागरिकांच्या विरोधामुळे शासनाने प्रकल्प रद्द करण्यात येत असल्याची अधिसूचना जाहीर केली. त्यामुळे स्थानिकांची सुटकेचा निश्‍वास टाकला.

काही राजकीय मंडळीनी स्वतःच्या स्वार्थासाठी जमीन व्यवहाराच्या उद्देशाने प्रकल्पाला स्थानिकांचा पाठींबा असल्याचे भासवून प्रकल्पाची मागणी केली; मात्र अजूनही स्थानिकांसह राजापूरातील नागरिकांचा प्रकल्पाला विरोध आहे. सद्यस्थितील महाविकास आघाडीसह मुख्यमंत्र्यांनी प्रकल्पाविषयी कोणतेही सूतोवाच केले नसल्याने स्थानिक अजूनही प्रकल्पाच्या विरोधात आहेत. शासनाने प्रकल्प होण्याची घोषणा केल्यास त्याला यापुढेही विरोध राहील. परंतु स्थानिकांना विश्‍वासात घेऊन विजयदुर्ग बंदराच्या विकासाला विरोध राहणार नसल्याचे प्रकल्पविरोधी कृती समितीमार्फत सांगितले जाते.

नुकतीच संबधितांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी विलास साळसकर, तालुकाप्रमुख मिलिंद साटम, प्रसाद करंदीकर, वर्षा पवार, संदीप डोळकर, सुनील जाधव उपस्थित होते. जोपर्यंत शासनाकडून प्रकल्पाबाबत जाहीर घोषणा होत नाही तोपर्यंत स्थानिक प्रकल्पाच्या विरोधात ठाम आहेत. विजयदुर्ग, रामेश्‍वर, गिर्ये, तिर्लोट, सौंदाळे, मुटाट, पाळेकरवाडी, मणचे, पोंभुर्ले, धालवली, कोर्ले ग्रामपंचायतींचा प्रकल्प विरोधी ठराव असताना पंचायत समितीने पाठींब्याचा ठराव घेतलेली गावे कोणती? प्रकल्पाबाबत आमनेसामने सभा घेतल्यास कुणाचे समर्थन आहे ते कळेल. 

भाजप प्रवेशासाठी ? 
प्रकल्पविरोधी मोर्चे काढले त्यावेळी तरूण नव्हते का? स्थानिकांना घेऊन मंदिरात आरत्या, घंटानाद केले ते भाजपमधील प्रवेशासाठी तर नाही ना? असा खोचक प्रश्‍नही विलास साळसकर यांनी उपस्थित केला. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Oppose To Nanar Project In Grampanchayat But Resolution In Panchayat Sammitti