मालवण स्मशानात अंत्यविधीस विरोध, अखेर पालिकेची मध्यस्थी

प्रशांत हिंदळेकर
Sunday, 20 September 2020

नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, बांधकाम सभापती यतीन खोत, मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांनी घटनास्थळी जात स्थानिकांचे गैरसमज दूर केले.

मालवण (सिंधुदुर्ग) - शहरातील एका कोरोना बाधित ज्येष्ठ नागरिकांचा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना आज मृत्यू झाला; मात्र त्यांच्या मृतदेहावर शहरातील सोमवारपेठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यास स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शवला. 

नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, बांधकाम सभापती यतीन खोत, मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांनी घटनास्थळी जात स्थानिकांचे गैरसमज दूर केले. नगराध्यक्ष, बांधकाम सभापती यांच्या मध्यस्थीनंतर नागरिकांनी सामंजस्याची भूमिका घेतली. अखेर आरोग्य विभागाचे नियम, निकषांचे पालन करत ओरोस येथून बंदिस्त स्वरूपात आणलेल्या मृतदेहावर दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. काही दिवसांपूर्वी अशाच स्वरूपात गैरसमजातून विरोध झाल्याने मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यास स्थानिकांनी विरोध केला होता. 

शहरातील भरड परिसरातील एका ज्येष्ठ नागरिकाचा कोरोना अहवाल आठ दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आला. त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांची ऑक्‍सीजन पातळी सतत कमी होत होती. गेले काही दिवस ते व्हेंटिलेटरवर होते; मात्र काल रात्री त्यांचे निधन झाले. त्यांच्या कुटुंबियांनी मृतदेह येथे आणून अंत्यसंस्कार करण्याची मागणी केली. 

शहरातील सोमवार पेठ स्मशानभूमीत त्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी तयारी सुरू करण्यात आली. मात्र स्थानिकांनी अंत्यसंस्कार करण्यास विरोध दर्शवला. बांधकाम सभापती यतीन खोत यांनी नागरिकांची समजूत काढत गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला. नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, मुख्याधिकारी जयंत जावडेकर हे घटनास्थळी दाखल झाले.

उपस्थितांशी चर्चा करत त्यांचे गैरसमज नगराध्यक्ष, बांधकाम सभापती यांनी दूर केले. त्यानंतर नागरिकांनी त्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास सहमती दर्शवली. तर नागरिकांच्या मागणीनुसार अंत्यसंस्कारानंतर स्मशानभूमी परिसर फवारणी करून निर्जंतुकीकरण करण्याचे प्रशासनाने मान्य केले. यापुढेही स्थानिक स्मशानभूमीशी संबंधित मृतदेह असेल तर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यास विरोध नाही. मात्र बाहेरील मृतदेहावर याठिकाणी अंत्यसंस्कार करू देणार नाही, अशीही भूमिका स्थानिकांनी जाहीर केली. 

अखेर प्रशासनास सहकार्य 
अखेर लीलाधर पराडकर व उपस्थित नागरिकांनी सामंजस्याची भूमिका घेत प्रशासनास सहकार्य केले. जिल्हा रुग्णालयात सर्व प्रक्रिया पूर्ण करत नातेवाईकांनी दुपारी मृतदेह ताब्यात घेतला. कोरोना खबरदारी पाळत बंदिस्त स्वरूपातील मृतदेह सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास शववाहिकेतून मालवणात आणला. खबरदारी घेऊन अंत्यसंस्कार करण्यात आले. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Opposition to the funeral at Malvan Cemetery