कोकण रेल्वेच्या खासगीकरणास विरोध; रेल्वेमंत्र्यांना निवेदन 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 29 September 2020

कोकणी माणसाच्या मुळावर येणारा हा निर्णय घेण्याचा प्रयत्न केंद्र सरकारने करू नये तसे झाले तर कोकणी जनता गप्प बसणार नाही. या आंदोलनात अनेक कामगार संघटना प्रकल्पग्रस्तही आमच्यासोबत असतील, असा इशाराही मुकादम यांनी दिला आहे. 

चिपळूण (रत्नागिरी) - कोकण रेल्वेचे खासगीकरण झाल्यास कोकणातील रेल्वेमार्गावरून एकही गाडी जाऊ देणार नाही, असा इशारा कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांनी दिला आहे. रक्त सांडले तरीही खासगीकरणाला विरोध राहील, असे त्यांनी सांगितले. 

केंद्र सरकारने कोकण रेल्वेचे खासगीकरण करण्याचा घाट घातला आहे. त्याला कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांनी तीव्र विरोध केला असून, रेल्वेमंत्र्यांना त्याबाबत निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, कोकण रेल्वेचे खासगीकरण झाल्यास येथे धनदांडग्यांची दादागिरी वाढेल. स्थानिक प्रवाशांसह कर्मचारी व प्रकल्पग्रस्तांवर अन्याय होईल. आताच या रेल्वेचा फायदा दाक्षिणात्य राज्यांना अधिक होतो. यापुढे कोकण रेल्वे हे नाव केवळ नावापुरतेच राहील. तिकिटाचे दर मनमानीने भरमसाठ वाढविले जातील. त्यामुळे सामान्य माणसाला प्रवास करणे अवघड होईल. 

कोकणी माणसाच्या मुळावर येणारा हा निर्णय घेण्याचा प्रयत्न केंद्र सरकारने करू नये तसे झाले तर कोकणी जनता गप्प बसणार नाही. या आंदोलनात अनेक कामगार संघटना प्रकल्पग्रस्तही आमच्यासोबत असतील, असा इशाराही मुकादम यांनी दिला आहे. 

आश्वासन अद्याप पाळलेले नाही 
कोकणातील जनतेने या प्रकल्पासाठी आपल्या बहुमूल्य जमिनी देऊन योगदान दिले. या वेळी रेल्वेत कोकणातील भूमिपुत्रांना व प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या देण्याचे आमिष दाखविण्यात आले. पण प्रत्यक्षात हे आश्वासन अद्याप पाळलेले नाही. या मार्गावरून इतर राज्यातील गाड्याच अधिक धावू लागल्या आणि कोकणी माणसाच्या नशिबी बोटावर मोजण्याइतपतच गाड्या राहिल्या. कोकण रेल्वे प्रकल्पात कोकणवासीयांची फसवणूकच अधिक झाली. विविध संघटनांनी याबाबत आपल्याशी चर्चा केली असून आपल्याला पाठिंबा दर्शविला आहे, असेही मुकादम यांनी सांगितले. 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Opposition To Privatization Of Konkan Railway Statement To Railway Minister