फळबाग लागवडीत तेंडोलीचा दुसऱ्यांदा ठसा

अजय सावंत
Thursday, 15 October 2020

जिल्ह्यामध्ये तेंडोली गाव सलग दुसऱ्या वर्षीही फळबाग लागवडीमध्ये अव्वल ठरला. चालू वर्षी गावात विविध प्रकारची सर्वाधिक लागवड झाली आहे.

कुडाळ (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यामध्ये तेंडोली गाव सलग दुसऱ्या वर्षीही फळबाग लागवडीमध्ये अव्वल ठरला. चालू वर्षी गावात विविध प्रकारची सर्वाधिक लागवड झाली आहे. कृषी विभागाच्या महिला कृषी सहाय्यक आर. आर. कुडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थ व शेतकऱ्यांच्या सहकार्याने हा गाव अव्वल ठरला आहे. येथील कृषी विभागातर्फे तेंडोली गावामध्ये विविध योजनांची मोठ्या प्रमाणात अंमलबजावणी सुरू आहे.

यामध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत फळबाग लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे. शेतकऱ्यांना भविष्यकाळात फळबाग लागवडीच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने तेंडोली कृषी सहाय्यक श्रीमती कुडाळकर यांनी एक महत्त्वाकांक्षी कार्यक्रम म्हणून महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवड योजना हाती घेतली आहे. त्यामध्ये गावात आजपर्यंत एकूण 50.46 क्षेत्रावर 64 शेतकऱ्यांनी फळबाग लागवडीचा लाभ घेतला. यामध्ये सलग क्षेत्रावर काजू, आंबा, साग, बांबू लागवड अशा विविध उत्पन्न देणाऱ्या पिकांची लागवड शेतकऱ्यांनी त्याच्या पडीक जमिनीत केली आहे. 

तेंडोली गावात भात पिकाचे क्षेत्र अतिशय कमी असून इथे खरिपामध्ये मोठ्या प्रमाणात भाजीपाला लागवड होते. तेंडोलीत यंदा लॉकडाउन कालावधीत व खरिपाच्या हंगामात शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात खते व बियाणे पुरवठ्याबाबत प्रश्‍न होते; परंतु एप्रिल व मे दरम्यान शेतकऱ्यांची आगाऊ मागणी घेऊन व आरसीएफ व खरेदी विक्री संघाच्या सहकार्याने शेतकऱ्यांना 25 टन खताचा पुरवठा शेतकऱ्यांच्या बांधावर उपलब्ध करून देण्यात आला. त्यामुळे शेतकऱ्यांचा मोठा प्रश्‍न मार्गी लागला. 
असेच नवनवीन उपक्रम कृषी सहाय्यकांच्या मार्फत गावामध्ये राबविले जात असतात. यामध्ये आणखी योजनांचा समावेश आहे. 

राज्य शासन कृषी विभागाच्या काही महत्त्वाकांक्षी योजना प्रस्तावित आहेत. यामध्ये विकेल ते पिकेल तसेच भारतीय प्राकृतिक कृषी पद्धती (बीपीकेपी) या प्रकल्पाधारित योजनांचा समावेश आहे, असे तालुका कृषी अधिकारी रमाकांत कांबळे यांनी सांगितले. 

तेंडोली गावात दरवर्षी मोठ्या प्रमाणात आंबा व काजू फळ पिक विमा उतरविला जातो. या योजनेच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांना विमा संरक्षण म्हणून भरपाई दिली जाते. चालू वर्षीही शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. 

तेंडोलीचे वैशिष्ट्ये 
- फळबाग लागवडीतून भविष्यात रोजगार 
- भावी पिढी आर्थिकदृष्ट्या सक्षम 
- भौगोलिक विचार करता हे गाव डोंगराच्या कुशीत 
- मोठ्या प्रमाणात कातळ व पडीक जमिनी 
- दरवर्षी मोठ्या प्रमाणात फळबाग लागवड 
- विविध पिकांचे उत्पन्न व भरपूर नफा 

कुडाळकरांचे योगदान 
तेंडोलीच्या कृषी सहाय्यक श्रीमती कुडाळकर या एक महिला कर्मचारी असूनही त्यांची गावातील शेतकऱ्यांच्यासाठी कामे करण्याची पद्धत व चिकाटी अतिशय आदर्श अशी आहे. कोणत्याही गावात अशा पद्धतीने काम केल्यास त्या गावाचा कृषी विकास करणे व रोजगार निर्माण करणे अवघड नाही, असे तेंडोली सरपंच मंगेश प्रभू यांनी सांगितले. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Orchard planting at Tendoli