ते पार्थिव बाहेर काढण्याचे आदेश, कोकणात कुठे झाला हा प्रकार 

शिवप्रसाद देसाई
Wednesday, 9 September 2020

सार्वजनिक आरोग्यास धोका निर्माण झाल्याने पार्थिव बाहेर काढण्यात यावे, असा मागणी अर्ज दाखल होता.

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी माठेवाडा भागातील दामोदर भारती मठात दफन करण्यात आलेले मठाधिपती श्रीकृष्ण गिरी यांचे पार्थिव बाहेर काढण्याचा आदेश आज उपविभागीय न्याय दंडाधिकारी तथा प्रांत सुशांत खांडेकर यांनी दिला. अखेर मंगळवारी सायंकाळी सहानंतर पालिका प्रशासनाने पोलिस बंदोबस्तात तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्या उपस्थितीत पार्थिव बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू केली. येथील उपरलकर स्मशानभूमीत उशिरा याचे दफन करणार असल्याचे पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले. यावेळी मोठा बंदोबस्त होता. 

पार्थिव बाहेर काढण्यासाठी गेलेल्या पालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसह तहसीलदार श्री. म्हात्रे यांच्याजवळ गिरी कुटुंबीयांनी विनंती करताना संबंधित पार्थिवाला आज बारा दिवस पूर्ण होणार आहेत. शिवाय हा निर्णय आपल्याला एकतर्फी वाटतो. या निर्णयाविरोधात आम्ही अपिल करणार आहोत. त्यासाठी आम्हाला आठ दिवसांचा वेळ देण्यात यावा, असे सांगितले; मात्र आम्हाला प्रांताचा आदेश असल्याने आम्ही काही करू शकत नाही. आम्हाला पार्थिव बाहेर काढावेच लागेल, असे प्रशासनाने स्पष्ट केले. 

माठेवाडा आत्मेश्वर मंदिर परिसरात दामोदर भारती मठात गिरी कुटुंबीयांनी मठाधिपती श्रीकृष्ण गिरी यांचे पार्थिव दफन केले होते. या प्रकारानंतर तेथील स्थानिक नागरिकांनी विरोध करत हे दफन केलेले पार्थिव बाहेर काढण्यासाठी पालिका प्रशासनासह उपविभागीय न्यायदंडाधिकारी तथा प्रांतांकडे धाव घेतली होती. दरम्यान, सोमवारी (ता. 7) स्थानिक नागरिकांतर्फे किरण सिध्दये यांच्यासह पस्तीस जणांनी कलम 133 अन्वये सार्वजनिक आरोग्यास धोका निर्माण झाल्याने पार्थिव बाहेर काढण्यात यावे, असा मागणी अर्ज दाखल केला. यानुसार प्रांतांच्या न्यायालयात दोन्ही बाजुच्या वकीलाकडून युक्तीवाद करण्यात आला होता. यामध्ये स्थानिक नागरिकांतर्फे पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे ऍड. समी ख्वॉजा यांनी तर गिरी कुटुंबीयांतर्फे ऍड. सुभाष पणदुरकर यांनी म्हणणे मांडले होते. 
याबाबतचा निर्णय आज देतांना प्रांत खांडेकर यांनी दफन पार्थिवामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे गिरी कुटूंबियांनी ते पार्थिव सायंकाळी सहापर्यंत काढावे, असा आदेश दिला. आदेशाचे गिरी कुटुंबीयांनी पालन न केल्यास कायदेशीर कारवाई करत पार्थिवाबाबत आदेशाची पालिकेने अंमलबजावणी करावी, असे स्पष्ट केले. 

दिलेल्या मुदतीत गिरी कुटुंबियांनी पार्थिव बाहेर काढण्यासाठी काहीच हालचाली केली नाही किंवा तो बाहेर काढला नाही. अखेर सहानंतर पोलिस प्रशासनाला सोबत घेत पालिकेची यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. यावेळी पोलिस उपनिरिक्षक अण्णासाहेब बाबर यांनी गिरी कुटूंबीयांना प्रांतांच्या आदेशाबाबत समजावले. तहसिलदार म्हात्रे तसेच पालिकेचे मुख्याधिकारी संतोष जिरगे घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पार्थिव बाहेर काढण्यास सुरूवात झाली. 

यावेळी गिरी कुटुंबीयांनी प्रांताधिकाऱ्यांनी एकतर्फी निर्णय दिला आहे, याबाबत आम्ही वरिष्ठ पातळीवर अपिल करणार आहोत. आम्ही आमच्या परंपरेनुसार दफन केलेले आहे. त्यामुळे आम्हाला आठ दिवसांचा वेळ मिळावा, अशी विनंती केली. आम्ही या निर्णयाबाबत प्रांतांना भेटायला गेलो होतो; मात्र वेळेअभावी भेट होवु शकली नाही, असे सांगितले. त्यावर म्हात्रे यांनी आम्हाला आदेश पाळावेच लागतील, असे स्पष्ट केले. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत पालिका यंत्रणेकडून खोदकाम करुन पार्थिव बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू होती. यावेळी माठेवाडा दामोदर भारती मठाच्या परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त होता. 

प्रांतांनी दिलेल्या निर्णयाचे स्वागत आहे, यापुढे तरी आशा कृत्यांना आळा बसावा, ही अपेक्षा आहे. अशा प्रसंगी नागरिकांचा एकजुटीचा फायदा झाला. आजचा निर्णय अगदी योग्य आहे. यापुढे असे कृत्य कोणीही करणार नाही. शेवटी सत्याचा विजय झाला. 
- किरण सिध्दये, तक्रारदार 

संपादन : विजय वेदपाठक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Order to exhume the buried corpse again where it happened