सिंधुदुर्गात शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादीमध्ये संघटनात्मक बदलाचे वारे 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 जुलै 2019

सावंतवाडी - विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रमुख राजकीय पक्षांनी संघटना पुर्नबांधणी सुरू केली आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही जिल्हा नेतृत्व बदलाच्या हालचाली सुरू आहेत. या पदासाठी इच्छूकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. 

सावंतवाडी - विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रमुख राजकीय पक्षांनी संघटना पुर्नबांधणी सुरू केली आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही जिल्हा नेतृत्व बदलाच्या हालचाली सुरू आहेत. या पदासाठी इच्छूकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. 

विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. गेली पाच वर्षे कोणत्याच पक्षाने संघटना बांधणीबाबत फारसे लक्ष दिले नव्हते; मात्र निवडणुकीच्या तोंडावर आता बदलाच्या हालचाली सुरू आहेत. शिवसेनेचे जिल्हा प्रमुखपद आमदार वैभव नाईक यांच्याकडे दीर्घकाळ आहे. आमदार झाल्यानंतर नाईक यांच्याकडील जिल्हाप्रमुखपद अन्य पदाधिकाऱ्यांकडे दिले जाईल, अशी शक्‍यता होती; मात्र तसे झाले नाही.

नुकतीच मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. यात पूर्ण जिल्ह्याकडे लक्ष देण्यात नाईक यांना वेळ मिळत नाही, अशी भावना पदाधिकाऱ्यांनी मांडली. आगामी निवडणूक लक्षात घेता नाईक यांना त्यांच्या कुडाळ मतदारसंघाला अधिक वेळ द्यावा लागणार आहे. यामुळे नवा जिल्हाप्रमुख देण्याचा निर्णय झाला आहे. याबाबतचा अंतिम निर्णय खासदार विनायक राऊत यांच्याकडे सोपवल्याचे समजते. शिवसेना दोन जिल्हाप्रमुख देण्याची शक्‍यताही वर्तवली जात आहे. 

विकास सावंत यांना प्रदेशचेपद ? 

काँग्रेसमध्येही अंतर्गत बदलांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद बाळासाहेब थोरात यांच्याकडे आल्यानंतर काही दिवसातच जिल्हाध्यक्ष विकास सावंत यांनी पदाचा राजीनामा दिल्याचे समजते. श्री. सावंत यांना प्रदेशचेपद दिले जाणार असल्याची चर्चा आहे. या पदासाठी साईनाथ चव्हाण, काका कुडाळकर आदींची नावे चर्चेत आहेत. येत्या आठ-दहा दिवसांत काँग्रेसकडूनही नवा जिल्हाध्यक्ष जाहीर होण्याची शक्‍यता आहे.

राष्ट्रवादीतही संघटना पुर्नबांधणीची चर्चा

राष्ट्रवादीने गेल्या दोन-तीन महिन्यांत जिल्ह्यातील संघटनेकडे विशेष लक्ष द्यायला सुरूवात केली आहे. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाकडे ते अधिक बारकाईने पाहत आहेत. येथील निरीक्षकपदी पुणे जिल्हा बॅंकेच्या उपाध्यक्ष अर्चना घारे परब यांची नियुक्‍ती करण्यात आली. त्यांनी पूर्ण मतदारसंघात कार्यक्रमांचा धडाका लावला. राष्ट्रवादीच्या अलिकडे झालेल्या मेळाव्यात संघटनेमधील अंतर्गत नाराजी समोर आली होती. जुने पदाधिकारी या मेळाव्याला अनुपस्थित होते. या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादीतही संघटना पुर्नबांधणीची चर्चा होती. विद्यमान जिल्हाध्यक्ष सुरेश गवस यांनी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढण्यासाठी मुलाखत दिली आहे. येथे सौ. घारे-परब यांचेही नाव चर्चेत आहे. या पार्श्‍वभूमीवर श्री. गवस यांना प्रदेश पातळीवरचे चिटणीसपद दिले जाण्याची शक्‍यता आहे. त्यांच्याकडूनही नवा जिल्हाध्यक्ष दिला जाण्याची शक्‍यता आहे. 

एकूणच प्रमुख पक्षांमध्ये संघटनात्मक बदलाच्या हालचाली सुरू आहेत. जिल्ह्याचे पद बदलल्यानंतर जिल्हांतर्गत संघटनेतही बदलाची शक्‍यता वर्तवली जात आहे. निवडणुकीच्या तोंडावर ते बदल असल्याने पक्ष श्रेष्ठींचा कस लागणार आहे. कारण सर्व समावेशक नेतृत्व निवडण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. 

मोर्चेबांधणी सुरू 
निवडणुकीच्या तोंडावर शक्‍यतो संघटनात्मक बदल केले जात नाहीत. यावेळची विधानसभा निवडणुक या दृष्टीने वेगळी ठरत आहे. भाजप आणि महाराष्ट्र स्वाभिमान वगळता इतर सर्व प्रमुख पक्षात संघटनात्मक बदलाचे वारे वाहत आहेत. हे बदल येत्या पंधरावड्यात होण्याची शक्‍यता आहे. यासाठी इच्छूकांनी अंतर्गत मोर्चेबांधणी सुरू केली आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Organizational change in Congress, NCP and ShivSena in Sindhudurg