जंगलावर अधिराज्य गाजविणारा बिबट्याची ओळख पटवतो ‘रोजेट पॅटर्न’

राजेश शेळके
Thursday, 29 October 2020

 

वन विभाग; दहा महिन्यात 8 बिबट्यांना जीवदान

रत्नागिरी : जंगलावर अधिराज्य गाजविणारा बिबट्या अन्नसाखळीतील महत्वाचा घटक परंतु बिबट्यांना उपजीविका भागविताना मोठी कसरत करावी लागली आहे. मानवी वस्तीच्या जवळ असणारा आणि सहज भक्ष्याला पकडण्यावर भर देणारा हा प्राणी आहे. बिबट्याचे हे धाडस त्याच्या जिवावर बेतते आहे. गेल्या दहा महिन्यात सात बिबटे विहिरीत पडले तर अन्य एक फास्कीत अडकला. आठही बिबट्यांना जीवदान देण्यात वन विभागाला यश आले. जीवदान दिलेल्या या बिबट्यांची फेर ओळख पटविण्यासाठी वन विभाग ‘रोजेट पॅटर्न’चा अवलंब करतो. बिबट्याच्या अंगावरील गोल ठिपक्या, वर्ण, रचनेतील बदल यावरून वन विभाग बिबट्यांची ओळख पटते.

जंगलांचा प्रचंड र्‍हास होत आहे. त्यामुळे वन्य प्राण्यांच्या आदिवासाचा प्रश्‍न निर्माण होतो. मात्र जिल्ह्यात हे चित्र नाही. जिल्ह्यात चांगले वनक्षेत्र आहे. पण बिबट्या हा मानवी वस्तीच्या आसपास राहणारा प्राणी आहे. कुत्रे, पाळीव जनावरे आदी सहज मिळणार्‍या शिकारीवर तो आपली उपजीविका भागवतो. गेल्या दहा महिन्यांमध्ये सात बिबट्यांच्या जिवावर अशी शिकार बेतली. हे बिबटे विहिरीत पडले. एक फास्कीत अडकला, अशा आठ बिबट्यांना वन विभागाने पिंजरा लावून सुरक्षित काढले. पशुवैद्यकीय अधिकार्‍यांमार्फत त्यांची तपासणी करून नैसर्गिक अधिवासात सोडले.नाखरे येथे विहिरीत पडून मृत झालेल्या बिबट्याला बाहेर काढण्यात आला.

हेही वाचा- बॅक वॉटर देईल कोकणातील तरुणांना रोजगार ; मार्केटिंगमुळे मिळेल पर्यटनाला चालना 

 

सापडलेल्या बिबट्यांना टॅग लावण्याची पद्धत इथे नाही. त्यामुळे एकदा पकडलेला बिबट्या परत सापडल्यास तोच आहे की नाही, हे समजण्यासाठी वन विभागाच्या अधिकार्‍यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. ‘रोजेट पॅटर्न’चा या तंत्राचा अवलंब करून बिबट्यांची ओळख वन विभाग आपल्याकडे ठेवते. बिबट्याच्या अंगावरील गोल ठिपके एक सारखे नसतात. त्यातील बारकावे, त्यांचा वर्ण, रचनेतील बदल यावरून वन विभागाला बिबट्यांची ओळख पटते.
बिबट्यांची ओळख पटण्यासाठी टॅग लावण्याची पद्धत आपल्याकडे नाही. मात्र आपण बिबट्यांची ओळख राहण्यासाठी ‘रोजेट पॅटर्न’चा वापर करतो. त्यामुळे पकडलेला बिबट्या परत सापडल्यास त्याची ओळख पटते. गेल्या दहा महिन्यात आम्ही विहिरीत पडलेल्या सात बिबट्यांना जीवदान दिले.

-प्रियांका लगड, परिक्षेत्र वनअधिकारी रत्नागिरी

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: osette pattern identifies leopard Forest Department Survived 8 leopards in ten months